कीव: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू होऊन तीन दिवस उलटले आहेत. बलाढ्य रशियाचा मुकाबला करताना युक्रेनची वाताहत होत आहे. युक्रेननं अनेक देशांकडे मदत मागितली आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशानं युक्रेनच्या मदतीसाठी लष्कर पाठवलेलं नाही. युक्रेनच्या रस्त्यांवर रशियाचे रणगाडे, शस्त्रसज्ज वाहनं दिसत आहेत. या दरम्यान सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये रशियन सैन्याचा एक रणगाडा रस्त्यावर उभा असलेला दिसत आहे. थोड्या वेळात तिथे एक युक्रेनी नागरिक पोहोचतो. तुम्हाला रशियापर्यंत लिफ्ट देऊ का, असं हा नागरिक रणगाड्याशेजारी उभ्या असलेल्या रशियन सैनिकांना विचारतो. रशियन सैनिक हसत हसत त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. संपूर्ण संवाद रशियन भाषेत आहेत. हा संवाद काही पत्रकारांनी इंग्रजीत भाषांतरित केला आहे.
रशियन भाषेतला व्हिडीओ युक्रेनमधील माजी पत्रकार व्हिक्टर कोवलेन्कोनं भाषांतरित केला आहे. कारमधील जाणारा युक्रेनी नागरिक सैनिकांना विचारतो, तुमचा रणगाडा नादुरुस्त झाला आहे का? त्यावर रशियन म्हणतात, आम्ही डिझेलची वाट पाहतोय. त्यावर युक्रेनी नागरिक गमतीत म्हणतो, तुम्हाला खेचत रशियापर्यंत घेऊन जाऊ शकतो. युक्रेनी नागरिकाचे उद्गार ऐकून रशियन सैनिक हसू लागतात. युक्रेन जिंकतोय आणि रशियन शरणागती पत्करत आहेत, असं म्हणत युक्रेनी नागरिक तिथून निघून जातो.