Russia vs Ukraine War: आमच्या मदतीला 'ते' १६ हजार जण येताहेत; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 05:05 PM2022-03-03T17:05:42+5:302022-03-03T17:07:12+5:30
Russia vs Ukraine War: रशियाविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनच्या मदतीला १६ हजार जण येणार
कीव: युक्रेन विरुद्ध रशिया युद्ध आठवड्याभरानंतरही सुरुच आहे. रशियानं युक्रेनचं प्रचंड मोठं नुकसान केलं आहे. युक्रेनी सैन्य बलाढ्य रशियन फौजेचा मुकाबला करत आहे. युरोपियन देशांमधून युक्रेनला मोठी लष्करी मदत मिळू लागली आहे. अनेक देश युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवत आहेत. यानंतर आता तब्बल १६ हजार स्वयंसेवक युक्रेनच्या मदतीला येणार असल्याची माहिती युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं.
आमच्याकडे स्वातंत्र्याशिवाय गमावण्यासारखं काहीच नाही. आम्हाला आंतरराष्ट्रीय पातळीवर मित्रराष्ट्रांकडून दररोज शस्त्रास्त्रं मिळत आहेत, असं झेलेन्स्की म्हणाले. रशियन लष्करानं आता आमच्या शहरांवर हल्ले सुरू केले आहेत. युक्रेनचा काही दिवसांता पाडाव करू असा रशियाचा डाव होता. मात्र आता त्यांना आमच्या रहिवाशी इमारतींवर हल्ले करावे लागत आहेत. यातच युक्रेनी सैन्याचं यश आहे, असं झेलेन्स्की यांनी म्हटलं.
युक्रेनच्या मदतीला येऊ इच्छिणाऱ्यांनी नोंदणी करावी असं आवाहन आम्ही केलं होतं. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. परदेशातून १६ हजार स्वयंसेवक युक्रेनच्या मदतीला येणार आहेत, अशी माहिती झेलेन्स्की यांनी दिली. अमेरिकेसह युरोपियन देशांनी आतापर्यंत युक्रेनला शस्त्रास्त्रं पुरवली आहेत. मात्र कोणत्याही देशानं युक्रेनच्या मदतीला लष्कर पाठवलेलं नाही.