मॉस्को – यूक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियानं आता यूरोपातील छोटा देश फिनलँडला सैन्य कारवाईची धमकी दिली आहे. जर फिनलँडने नाटो जॉईन केले तर त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतील असं रशियानं म्हटलं आहे. त्यात सैन्य कारवाईही करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही उत्तर युरोपच्या सुरक्षेसाठी फिनलँडची तटस्थपणाला महत्त्वाचा घटक मानतो असं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. याआधी, फिनिश पंतप्रधानांनी धमकी दिली होती की जर त्यांचे राष्ट्रीय हित धोक्यात आले तर त्या नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करेल.
फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांनी देशाच्या संसदेत सांगितले की, 'राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न वाढल्यास फिनलँड नाटो सदस्यत्वासाठी अर्ज करण्यास तयार आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या कारवाईमुळे फिनलँडने नाटोमध्ये सामील व्हावे की नाही, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तेही जेव्हा युरोपमध्ये नाटोच्या विस्ताराला रशिया कडाडून विरोध करत आहे. यापूर्वी, फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणाले होते की त्यांच्याकडे कधीही नाटोमध्ये सामील होण्याचा पर्याय आहे.
तसेच प्रत्येक देशाला त्याचे सुरक्षा धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. 'आम्ही भूतकाळातून बरेच शिकलो आहोत. आम्ही आमच्या देशात युद्ध होऊ देणार नाही असं एका भाषणात पंतप्रधान मारिन म्हणाल्या. फिनलँडच्या पंतप्रधानांच्या या घोषणेने रशिया संतापला आहे. खरेतर, फिनलँड नाटोमध्ये सामील होणे हा रशियासाठी मोठा धोका ठरू शकतो. फिनलँडच्या भौगोलिक स्थितीने रशियाला नेहमीच चिंतेत टाकले आहे. नाटोशी सामना करण्यासाठी रशिया युक्रेनवर बॉम्बहल्ला करत आहे. हाच नाटो युक्रेनमार्गे नाही तर फिनलँडमार्गे रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचू शकतो.
वास्तविक, रशियाची आर्थिक राजधानी आणि अब्जाधीशांचे शहर असलेल्या सेंट पीटर्सबर्ग फिनलँडच्या सीमेला लागून आहे. जर फिनलँड नाटोचा सदस्य झाला तर रशियाची उत्तरेकडे नाटो पोहचेल आणि भविष्यात तणाव वाढू शकतो. यामुळेच रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने फिनलँडलाच नव्हे तर स्वीडनलाही लष्करी कारवाईची धमकी दिली आहे. सेंट पीटर्सबर्ग शहर बाल्टिक समुद्राला लागून आहे आणि या समुद्राच्या दुसऱ्या बाजूला फिनलँड आहे. अमेरिकेच्या आण्विक पाणबुड्याही येथे अनेकदा येतात. नाटोमध्ये सामील होताच यूएस नेव्ही आणि एअर फोर्सला फिनलँडमध्ये प्रवेश मिळेल.
एवढेच नाही तर रशियाने फिनलॅंडला लक्ष्य केले तर नाटो देश त्याच्या मदतीला येतील. दुसरीकडे फिनलॅंडविरुद्ध रशियाचा वाढता धोका पाहता फिनलॅंडला आता आपली तयारी अधिक मजबूत करावी लागेल, अशी भीती वाटत आहे. रशियाही फिनलॅंडच्या ऊर्जा धोरणावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. फिनलँडने रशियामध्ये मोठी धोरणात्मक गुंतवणूक टाळावी, असे एका अहवालात म्हटले आहे.