मॉस्को: अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानकडून लवकरच सत्ता स्थापन करण्यात येणार आहे. उद्या तालिबान सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. तालिबाननं सरकार स्थापनेच्या सोहळ्यासाठी भारत, चीन, अमेरिका, पाकिस्तान, रशिया, इराण, तुर्कस्तानसह अनेक देशांना आमंत्रण दिलं आहे. मात्र सरकार स्थापनेआधीच रशियानं तालिबानला मोठा धक्का दिला आहे.
तालिबानच्या सत्ता स्थापना सोहळ्यात सहभागी होण्यास रशियानं नकार दिल्याचं वृत्त आरईए वृत्तसंस्थेनं दिलं आहे. तालिबानच्या सरकार स्थापनेच्या कार्यक्रमात कोणत्याही प्रकारचा सहभाग घेण्यास रशियानं इन्कार केला आहे. तालिबानच्या सरकार स्थापना सोहळ्यात राजदूत दर्जाचे अधिकारी सहभागी होतील अशी माहिती याआधी रशियाकडून देण्यात आली होती. मात्र आता रशियानं सत्ता स्थापना सोहळ्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. यामागचं कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाही.
उद्या शपथविधी होण्याची शक्यतातालिबानचा शपथविधी उद्या होण्याची शक्यता आहे. वीस वर्षांपूर्वी ११ सप्टेंबरला अमेरिकेची ट्विन टॉवर्स जमीनदोस्त करण्यात आली होती. अमेरिकेवर झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. त्यामुळे जगभरात हा दिवस काळा दिवस मानला जातो. ओसामा बिन लादेननं हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यानंतर अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानात शिरलं. त्यावेळी अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता होती. २० वर्षांनंतर अमेरिकन सैन्य माघारी परतलं आणि तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केला.