वाॅशिंग्टन : युक्रेनची राजधानी कीव्ह या शहराला ताब्यात घेण्यासाठी रशियाला अजूनही यश मिळालेले नाही, त्यामुळे रशिया वेगळाच डाव खेळण्याच्या तयारीत आहे. शहरी युद्ध आणि संघर्षात निष्णात असलेल्या सिरियन याेद्ध्यांना पैसे देऊन कीव्हचा ताबा मिळविण्याची याेजना रशियाने आखल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युक्रेनचे सैन्य व नागरिकांनी कडवा प्रतिकार केल्यामुळे रशियाला कीव्ह शहराचा ताबा मिळू शकलेला नाही. त्यामुळे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन संतापले आहेत. त्यामुळे रशियाने सिरियातील याेद्ध्यांना या युद्धात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतील काही सूत्रांनी रशियाच्या याेजनेबाबत माहिती दिली. त्यानुसार सिरियातील काहीजण रशियामध्ये यापूर्वीच दाखल झाले असून, कीव्हवर हल्ला करण्याची त्यांनी तयारी सुरू केली आहे.
२०० ते ३०० डाॅलर्स देणार
रशियाकडून अशा प्रकारची भरती हाेत असल्याच्या बातम्या सिरियन माध्यमांमध्ये झळकल्या हाेत्या. युद्धात सहभागी हाेणाऱ्यांना २०० ते ३०० डाॅलर्स देण्याची रशियाची तयारी आहे. लिबियाविराेधातील युद्धामध्ये या लाेकांनी शहरी युद्धातून प्रतिकार केला हाेता. त्यात रशियाने सिरियाला मदत केली आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयातील सुनावणीकडे रशियाची पाठयुक्रेनवर हल्ला केल्याप्रकरणी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. त्याबाबत सोमवारी झालेल्या सुनावणीकडे रशियाने पाठ फिरविली. रशियाला ताबडतोब लढाई थांबविण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती युक्रेनने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला केली आहे. युक्रेनचे प्रतिनिधी ॲन्टॉन कोरिनेविच यांनी न्यायाधीशांना सांगितले की, युक्रेनमध्ये हत्याकांडे घडविण्यात आल्याचा रशियाचा आरोप अतिशय चुकीचा आहे. युक्रेनला आपल्या टाचेखाली ठेवण्याची रशियाला इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी हे युद्ध आमच्यावर लादले आहे.युद्धासंदर्भात आंतरराष्ट्रीय न्यायालय लवकरच निर्णय देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे आलेल्या युक्रेनबाबतच्या तोंडी सुनावणीत सहभागी होण्यास रशियाने नकार दिला आहे.