मॉस्को - 62 प्रवाशांना घेऊन जात असलेले रशियन विमान मॉस्कोजवळ कोसळल्याचे वृत आहे. हे विमान दोमोदेदोव्ह विमानताळावरून ओर्स्ककडे निघाले होते. विमानाने मॉस्को येथील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाचा रडारशी संपर्क तुटल आणि हे विमान अपघातग्रस्त झाले. दरम्यान रशियामधील यंत्रणांनी या विमानाला अपघात झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला असून, अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडल्याची माहिती दिली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सारातोव्ह एअरलाइन्सचे एंटोनोव्ह एन-148 हे विमान दोमोदेदोव्ह विमानताळावरून ओर्स्क येथे जात होते. या विमानामध्ये 65 प्रवासी आणि चालक दलाचे सहा कर्मचारी होते. या विमानाचा काही भाग सापडला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच अपघातस्थळी एक पथक रवाना करण्यात आल्याचे आपातकालीन मंत्रालयाने सांगितले आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अरुगुनोव्हो गावातील नागरिकांनी जळते विमान आकाशातून खाली पडताना पाहिले होते. अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. पण खराब हवामान आणि वैमानिकाकडून झालेल्या चुकीमुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.