लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : युद्धग्रस्त युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा एक कुत्रा आता रशियाच्याच विरोधात युक्रेनच्या सैन्याला मदत करतोय. युक्रेनचे सैन्य त्या कुत्र्याचा वापर रशियाविरुद्धच करत आहेत. मॅक्स असे या ‘बेल्जियन मालिनॉइस’ जातीच्या कुत्र्याचे नाव असून तो ३ वर्षांचा आहे. खरं तर युक्रेनच्या एका गावातून माघार घेत असताना रशियन सैन्य मॅक्सला तिथेच सोडून गेले.
रशियाच्या सैनिकांनी काळ्या समुद्राजवळील मायकोलिव्ह प्रदेशातील एक गाव काबीज केले तेव्हा मॅक्स त्यांच्या सैन्यासोबत होता. एकटा राहिल्यामुळे मॅक्सची प्रकृती खालावली आणि तो आजारी पडला. कुजलेले अन्न खाऊन तो कसाबासा जिवंत राहिला. दरम्यान, जेव्हा युक्रेनियन सैनिक गावात परतले तेव्हा त्यांनी मॅक्सला पाहिले आणि तो रशियन सैन्याच कुत्रा असल्याचेही ओळखले. युक्रेनियन सैनिकांनी मॅक्सची खूप काळजी घेतली. त्याला चांगले जेवण आणि औषधे दिली. रुग्णालयातही घेऊन गेले व त्याच्यावर उपचार केले. यानंतर युक्रेनियन सैन्याने मॅक्सला त्यांच्या आदेशाचे पालन करण्याचे प्रशिक्षण दिले. आता मॅक्स पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि तो युक्रेनियन सैनिकांच्याच आज्ञा ऐकतो.
रशियन लोकांनी मॅक्ससारख्या प्राण्याला वाऱ्यावर सोडल्याचे मला खूप आश्चर्य वाटतेय. असे ब्रिटिश विशेष दलातील एक सैनिक म्हणाला. कुत्र्याच्या या जातीचा वापर एसएएस आणि एसबीएसद्वारेही केला जातो. ते शूर, अत्यंत हुशार आणि ऍथलेटिक असतात. ते कमालीचे निष्ठावान देखील असतात, पण युक्रेनियन आता आपले नवीन मालक आहेत याची मॅक्सला खात्री पटली आहे.
‘रशियन सैनिकांनी इतक्या गोंडस प्राण्याला का मागे सोडले हेच आम्हाला समजत नाहीये. मॅक्स आमच्या सैनिकांचा खूपच आवडता बनलाय. आता मॅक्स युक्रेनचे रक्षण करतोय,’ असे युक्रेनियन नॅशनल गार्डचे सदस्य दिमित्री म्हणाले.