रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धामुळे तणावग्रस्त असलेल्या दोन्ही देशांच्या सीमेलगत आज एक मोठी विमान दुर्घटना झाली आहे. युक्रेनच्या सीमेजवळ रशियन लष्कराचे विमान कोसळून ही दुर्घटना झाली आहे. त्यामध्ये ६५ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला आहे. मृत्यू झालेले ६५ जण हे रशियाच्या ताब्यात असलेले युक्रेनच्या सशस्त्र दलाचे कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
या भागातील स्थानिक गव्हर्नर व्याचेस्लाव्ह ग्लादकोव्ह यांनी मला या दुर्घटनेबाबत प्राथमिक माहिती आहे, असे सांगितले. मात्र त्यााबाबत काही अधिक माहिती देण्यास त्यांनी नकार दिलाा दुर्घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विमान खाली कोसळताना दिसत आहे. रशिया टुडे इंडियानेही या दुर्घटनेचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये रशियन लष्कराचं एक वाहतूक विमान अचानक खाली येताना आणि एका रिफायनरीजवळ कोसळताना दिसत आहे.
एका वृत्तसंस्थेने रशियन संरक्षण मंत्रालयाचा हवाला देत सांगितले की, या विमानात युक्रेनच्या लष्करातील पकडण्यात आलेले ६५ सैनिक होते. त्यांना एक्स्चेंजसाठी बेलगोरोद येथे आणण्यात येत होते. त्यांना युक्रेनच्या सीमेवर नेण्यात येणार होते. तसेच विमानामध्ये ६ क्रू मेंबर आणि कैद्यांना आणण्यासाठी निघालेले ३ एस्कॉर्ट्सही होते. दरम्यान, रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत हजारो सैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे.