मॉस्को - रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचे सर्वात मोठे विरोधक अॅलेक्सी नवलनी यांना येथील एका न्यायालयाने साडे तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नवलनी यांच्यावर मागील गुन्हेगारी प्रकरणात झालेल्या अटकेनंतर पॅरोलच्या नियमांचे उलंघण केल्याचा आरोप आहे. नवलनी यांना शिक्षा सुनावल्यानंतर रशियात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यातच रशियात परतल्यापासून नवलनी अटकेत आहेत. यापूर्वी नवलनी यांच्यावर विषारी पदार्थाचाही प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यावर जर्मनी येथे उपचार सुरू होते.
नवलनी न्यायालयात म्हणाले पुतीन हल्लेखोर -सुनावणीदरम्यान, राष्ट्रपती पुतीन यांनी आपल्याला विष दिले असून ते आपल्यावरील हल्ल्याचे दोषी आहेत, असे नवलनी यांनी म्हटले आहे. नवलनी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी याविरोधात रॅलीचे आवाहन केले आहे. यादरम्यान जवळपास तीनशे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवलनी यांच्या वकिलाने म्हटले आहे, की या निर्णयाविरोधा आम्ही अपील करणार आहोत. नवलनी यांना शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर अनेक देशांनी, विशेषतः पश्चिमेकडील देशांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंग्लंडचे परराष्ट्रमंत्री डॉमिनिक राब यांनी, हा निर्णय अनुचित असल्याचे म्हटले आहे. अमेरिकन परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी रशियाच्या या न्यायालयाच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली आहे. यूरोपीय काउंसिलने म्हटले आहे, की न्यायालयाच्या या निर्मयात विश्वासाची उपेक्षा करण्या आली आहे. या सर्व प्रतिक्रियांनंतर रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जखारोवा यांनी, पश्चिमेकडील देशांनी आपल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करावे. कुठल्याही सार्वभौम राष्ट्राच्या अंतर्गत विषयात लक्ष देणे योग्य नाही, असे म्हटेल आहे.
2008 मध्ये पहिल्यांदाच चर्चेत आले होते नवलनी -रशियन राष्ट्रपती पुतीन यांचे सर्वात मोठे विरोधक म्हणून नवलनी ओळखले जातात. त्यांनी 2008 मध्ये एक एक ब्लॉग लिहून सरकारी कंपन्यांमधील भ्रष्टाचार बाहेर आणला होता. याच वेळी ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. यानंतर सरकारमधील अनेक अधिकाऱ्यांना राजीनामा द्यावा लागला होता. सरकार विरोधात ब्लॉग लिहिने आणि रशियन संसद डूमा बाहेर सरकारविरोधी रॅली काढणे यासाठी त्यांना 2011 मध्ये कारागृहातही जावे लागले होते. पहिल्यावेळी त्यांना 15 दिवसांसाठी कारागृहात जावे लागले होते.