आपल्या सर्वांनाच अंतराळाचे कुतूहल आहे. प्रत्येकाला अंतराळात काय आहे, हे जाणून घ्यायला आवडतं. या अंतराळावर 'ग्रॅव्हिटी', 'इंटरस्टेलर', 'मार्शियन', 'स्टोअवे'सारखे अनेक चित्रपट बनले आहेत. त्या चित्रपटांमध्ये अंतराळातील जग दाखवलं आहे, पण त्याचं शूटींग पृथ्वीवरच करण्यात आलंय. पण, आता एका चित्रपटाचं शूटींग चक्क अंतराळात होणार आहे.
काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूजने त्याच्या एका चित्रपटाचे शूटींग अंतराळात होणार असल्याची माहिती दिली होती. पण, आता रशियन दिग्दर्शक क्लिम शिपेंको याने त्या आधीच अंतराळात शूटींग करण्याचा निर्णय घेतला आहे. क्लिम शिपेंको आपल्या अपकमिंग 'चॅलेंज'या चित्रपटाचे शूटींग इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर करणार आहे. अमेरिक अंतराळ संस्था NASA ने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन ही माहिती दिली आहे.
NASA ने आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, रशियन दिग्दर्शक क्लिम शिपेंको आज म्हणजेच 5 ऑक्टोबर(मंगळवारी) 'चॅलेंज' चित्रपटाच्या शूटींगसाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे रवाना झाले आहेत. आता अंतराळात चित्रपटाचे शूटींग करणारा रशिया पहिला देश बनणार आहे. NASA ने पोस्टमध्ये रशियन अभिनेत्री यूलिया पेरसिल्ड, दिग्दर्शक शिपेंको आणि अॅस्ट्रोनॉट एंटोन श्काप्लेरोव अंतराळात गेल्याची माहिती दिली आहे.
NASA ने पोस्टमध्ये सांगितले की, यूलिया पेरसिल्ड आणि क्लिम शिपेंको आणि एंटोन श्काप्लेरोव 5 ऑक्टोबरला कजाखस्तानच्या बॅकोनूर कोस्मोड्रोमवरुन भारतीय वेळेनुसार दुपारी 2:25 वाजता इंटरनॅशनल स्पेस स्टेशनकडे उड्डाण घेतली. रशियाची अंतराळ संस्था रोस्कोस्मोसद्वारे चालक दलाला सोयुज एमएस-19 यानातून ISS कडे लॉन्च करण्यात आलं आहे.
12 दिवस अंतराळात शूटींग'चॅलेंज' चित्रपटाच्या शूटींगसाठी चित्रपटाच्या सर्व क्रुला ट्रेनिंग देण्यात आली आहे. 'चॅलेंज'चे विविध सीन्स शूट करण्यासाठी सर्व टीम 12 दिवस अंतराळात राहणार आहे. यादरम्यान चित्रपटातील 35-40 मिनीटांचा मोठा सीक्वेंस शूट केला जाईल. या चित्रपटात एका महिला डॉक्टरची गोष्ट सांगण्यात आली आहे, जी एका अंतराळवीराचा जीव वाचवण्यासाठी इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला जाते.