मॉस्को: युक्रेन आणि रशिया यांच्यातलं युद्ध दोन आठवडे उलटल्यानंतरही सुरुच आहे. या युद्धाचे परिणाम आता दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेवर दिसत आहेत. रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यानं अमेरिका, युरोपियन देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादले. त्यानंतर अनेक बड्या कंपन्यांनी रशियातील आपले व्यवसाय बंद केले. त्याचे परिणाम आता लोकांच्या खाण्यापिण्यावर दिसून येत आहेत.
रशियाविरोधात पाश्चिमात्य देशांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मॅक्डॉनल्ड्स, स्टारबक्स, कोकाकोला, पेप्सिकोसारख्या बड्या ब्रँड्सनी रशियातील व्यवसाय बंद केला. यामुळे मॅक्डॉनल्ड्सच्या चाहत्यांना मात्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. 'द सन'च्या वृत्तानुसार, मॅक्डॉनल्ड्सनं रशियातील व्यवसाय बंद करण्यापूर्वी एका बर्गरप्रेमींनं त्याचा संपूर्ण फ्रीज बर्गरनं भरला. त्याच्या फ्रीजमध्ये जवळपास ५० बर्गर राहू शकत होते. फ्रीजमधील प्रत्येक कप्प्यात त्यानं बर्गर भरले.
बर्गरप्रेमीच्या फ्रीजचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात बर्गरनं भरलेला फ्रीज दिसत आहे. आता बाजारात मॅक्डॉनल्ड्सचे बर्गर मिळत नसल्यानं काळाबाजार सुरू झाला आहे. काही ठिकाणी बर्गरसाठी लिलाव सुरू आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही जण मॅक्डॉनल्ड्सचे खाद्यपदार्थ चढ्या किमतीला लिलाव करून विकत आहेत.
शिकागोमध्ये मुख्यालय असलेल्या मॅक्डॉनल्ड्सनं रशियातील ८५० रेस्टॉरंट्स बंद केली आहेत. मात्र रशियातील ६२ हजार कर्मचाऱ्यांना कंपनी अद्यापही पगार देत आहे. रशियातील मॅक्डॉनल्ड्सची रेस्टॉरंट्स कधी सुरू होणार, हे सांगणं सध्या तरी अवघड असल्याचं सीईओ ख्रिस केम्पचिन्स्की म्हणाले. मॅक्डॉनल्ड्स रशियात दररोज लाखो लोकांना सेवा देतं.