मॉस्को : लाइट, कॅमेरा, ॲक्शन...कट... ही बाॅलीवूडसह अन्य चित्रपटनगरीतील परावलीची शब्दावली आता अंतराळातही गुंजणार आहे. अंतराळात जगातील पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रशियन अभिनेत्री युलिया पेरेसिल्द आणि चित्रपट दिग्दर्शक क्लिम शिपेन्को अंतराळ सफरीवर रवाना झाले आहेत.
रशियाच्या सोयुझ अंतराळ यानातून अभिनेत्री युलिया आणि दिग्दर्शक शिपेन्को आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत तीनदा अंतराळ सफर करणारे अंतराळवीर ॲन्तॉन शकाप्लेरोव्ह आहेत. सोयुझ-एमएस-१९ बैकानूर येथील अंतराळयान प्रक्षेपणतळावरून दुपारी १.५५ वाजता अंतराळ स्थानकाकडे झेपावत कक्षेत पोहोचले. अभिनेत्री आणि दिग्दर्शकासह त्यांच्यासोबतचे सर्व अंतराळ सहप्रवासी आनंदी असून, यानाची सर्व कार्यप्रणाली व्यवस्थित आहे, असे अंतराळ अधिकाऱ्यांनी सांगितले.
अंतराळात चित्रीकरण ही आव्हानात्मक मोहीम आहे. अभिनेत्री युलिया आणि दिग्दर्शक शकाप्लेरोव्ह ‘चॅलेंज’ असे शीर्षक असलेल्या नवीन चित्रपटाचा एक भाग तेथे चित्रित करणार आहेत. या चित्रपटात डॉक्टरची भूमिका करणारी अभिनेत्री युलिया पेरेसिल्द हृदयविकाराने आजारी असलेलेल्या एका अंतराळवीराला वाचविण्यासाठी थेट अंतराळ स्थानकाकडे रवाना होते. तब्बल १२ दिवस चित्रीकरणासाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मुक्काम करून हे पथक दुसऱ्या एका रशियन अंतराळवीरासोबत पृथ्वीकडे परतणार आहे.
अंतराळ क्षेत्रात देशासाठी अभिमानाची बाब
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रयाण करण्यापूर्वी सोमवारी पत्रकार परिषदेत बोलताना अभिनेत्री युलिया पेरेसिल्द म्हणाल्या की, अंतराळ सफरीसाठी प्रशिक्षण घेताना शिस्त आणि कठीण प्रशिक्षण यात ताळमेळ बसविणे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. प्रशिक्षण मानसिक, शारीरिक आणि सर्वच दृष्टीने कठीण होते. एकदा का आम्ही लक्ष्य साध्य केले, तर सर्वकाही कठीण वाटणार नाही आणि सुखद अनुभवासह चेहऱ्यावरील स्मित लकेरीसह हा क्षण आठवणीत राहील. दिग्दर्शक शिपेन्को यांनीही चार महिन्यांचा प्रशिक्षण काळ कठीण होता, असे सांगितले.
या विशेष मोहिमेमागचे रॉस्कोमॉस या रशियन सरकारच्या स्पेस काॅर्पोरेशनचे प्रमुख दिमित्री रॉगॉझिन यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही मोहीम अंतराळ क्षेत्रात देशाची ही अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या रशियाच्या भागात चित्रीकरण कठीण असू शकते. कारण रशियाच्या हिश्श्यातील हा भाग अमेरिकेच्या भागापेक्षा छोटा आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला जुलैत रशियाने नवीन लॅब मॉड्युल ‘नौका’ जोडण्यात आले असले तरी ते पूर्णत: स्थानकाला जोडले गेलेले नाही, असे काही लोकांचे म्हणणे आहे. या चित्रपटात आजारी अंतराळवीराची भूमिका रॉस्कोमॉसचे ओलेन नोव्हीत्स्की करणार आहेत. १७ ऑक्टोबर रोजी पृथ्वीवर परतणाऱ्या सोयुझ यानाचे हे सारस्थही करणार आहे.