युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाला आता जगात एकाकी पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या बैठकीतही काहीसे असेच दृश्य बघायला मिळाले. या बैठकीत रशियाचे परराष्ट्र मंत्री सेरेजे लावरोव्ह यांचे संबोधन सुरू होताच अनेक देशांचे नेते उठून निघून गेले. खरे तर, लावरोव यांचा आधीपासूनच रेकॉर्ड असलेला व्हिडिओ सुरू करण्यात आला होता. तो सुरू होताच अनेक देशांचे नेते उठून निघून गेले. हा रशियाव दबाव टाकण्याचा एक प्रयत्न होता.
या वॉकआउटचे नेतृत्व करणारे युक्रेनचे राजदूत येव्हेनिया फिलिपेंको म्हणाले, 'युक्रेनियन जनतेसाठी आपण जो पाठिंबा दिला, त्यासाठी आम्ही आपले खूप आभारी आहोत. त्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपण हा पाठिंबा दिला आहे.'
रशियन परराष्ट्रमंत्र्यांनी ऐन वेळी रद्द केला होता UN दौरा -खरे तर या बहिष्कारावेळीही (बायकॉट) येमेन, सीरिया, व्हेनेझुएला आणि ट्युनिशियाचे डिप्लोमॅट्स (Diplomats) तेथेच बसून होते आणि रशियन परराष्ट्रमंत्र्यांचे भाषण ऐकत होते. रशियन परराष्ट्रमंत्र्यांना मंगळवारी जिनेव्हा येथे बैठकीसाठी पोहोचायचे होते. मात्र, युरोपीयन देशांनी बॅन केल्याचा हवाला देत त्यांनी त्यांचा प्रवास रद्द केला होता.
दरम्यान, युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियावर युद्धाचा गुन्हा केल्याचा आरोप केला आहे. मंगळवारी एक व्हिडीओ मेसेज जारी करत, रशियाने सर्वसामान्य नागरिकांची हत्या केली आहे. रशियाची ही क्रुरता कुणीही विसरणार नाही आणि रशियाला माफही करणार नाही, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.