Russia Vladimir Putin : रशियाच्या सरकारी चॅनलने राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (President Vladmir Putin) यांचं भाषण सुरू असताना मध्येच ते थांबवलं. पुतिन हे शुक्रवारी मॉस्कोतील मुख्य फुटबॉल स्टेडिअमवर (Football Stadium) हजारो समर्थकांना संबोधित करत होते. यादरम्यान, सरकारी चॅनलने पुतीन यांच्या भाषणाऐवजी अचानक देशभक्तीपर संगीताची क्लिप दाखवण्यास सुरुवात केली.
रशियातील सरकारी चॅनलवर कठोरपणे नियंत्रण ठेवलं जातं. त्यामुळे अशाप्रकारे राष्ट्राध्यक्षांचं भाषण मध्येच थांबवलं जाणं असामान्य आहे. परंतु यावर काही वेळानं क्रेमलिनकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. सर्व्हरमध्ये निर्माण झालेल्या तांत्रिक समस्येमुळे हे प्रसारण बाधित झाल्याचं सांगण्यात आलं. जवळपास १० मिनिटांनंतर सरकारी चॅनलनं पुन्हा एकदा पुतीन यांचं भाषण दाखवण्यास सुरूवात केली.
पुतीन यांच्या या संबोधनाचं प्रसारण सरकारी चॅनलद्वारे करण्यात येत होतं. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे हे प्रसारण थांबल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. परंतु पुतीन ज्यावेळी युक्रेनवरील हल्ल्यावर स्पष्टीकरण देत होते, त्याचवेळी हे प्रसारण थांबलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे पुतीन यांना अनेक देशांचा विरोधही सहन करावा लागत आहे.