नवी दिल्ली - रशिया आणि भारत यांच्यातील ऐतिहासिक मैत्री अनेक प्रसंगी खरी ठरली आहे. पुन्हा एकदा दहशतवादाच्या समर्थनावर पाकिस्तान आणि चीन एकाच सूरात बोलत असताना रशियाने एक नकाशा जारी करून या दोन्ही देशांची बोलती बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. रशियन न्यूज एजन्सी स्पुतनिकने जारी केलेल्या नकाशात अक्साई चीनसह अरुणाचल प्रदेश आणि पाकव्याप्त काश्मीर (POK) भारताचा भाग असल्याचं दाखवलं आहे. याशिवाय जम्मू-काश्मीर आणि लडाखलाही भारताचा अविभाज्य भाग म्हणून दाखवण्यात आले आहे.
रशियन सरकारने शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या सदस्य देशांचा हा नकाशा जारी केला आहे. भारत-रशिया मैत्रीच्या खूणा त्याच्यातून स्पष्टपणे दिसून येतात. पाकिस्तान आणि चीन देखील SCO चे सदस्य आहेत परंतु याची पर्वा न करता रशियाने हा नकाशा जारी केला आहे. रशियाने जारी केलेल्या या नकाशामुळे जागतिक व्यासपीठ आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनमधील भारताचे स्थान आणखी मजबूत झाले आहे. भारतातील सरकारी सूत्रांनी सांगितले की, SCO च्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून रशियाने नकाशा अचूक रेखाटून विक्रम केला आहे.
चीनने त्यांच्या हद्दीत दाखवला भारताचा भागदुसरीकडे, चीनने एससीओसाठी जारी केलेल्या नकाशात भारतातील काही भाग स्वतःचं असल्याचं म्हटलं आहे. हे त्यांच्या विस्तारवादी धोरणाचे लक्षण आहे. हा नकाशा पाकिस्तानसाठीही धक्कादायक आहे, कारण काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या राजदूताच्या पीओके भेटीदरम्यान या भागाचे वर्णन 'आझाद काश्मीर' असे करण्यात आले होते. त्याचवेळी, जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनीही अलीकडेच भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर वाद सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीची सूचना केली होती.