Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाही. रशियाने सोमवारी युक्रेनची राजधानी कीव्हवर मोठा हल्ला केला. हा हल्ला युक्रेनवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला असल्याचे बोलले जात आहे. रशियाकडून कीव्हमधील मुलांच्या रुग्णालयावर तसेच अनेक निवासी भागातील मोठ्या इमारतींवर हा हल्ला करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रशियाने ४० हून अधिक क्षेपणास्त्रांनी युक्रेनच्या पाच शहरांना लक्ष्य केले. या हल्ल्यात कीव्हमधील रुग्णालयातील सात मुलांचा मृत्यू झाला, तर क्रिवी रिह शहरात झालेल्या दुसऱ्या हल्ल्यात दहा लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मृतांचा आकडा सांगता येणार नाही. सध्या मुलांच्या रुग्णालयात बचावकार्य सुरू आहे. तसेच, हल्ल्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचाही शोध घेतला जात आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांची अद्याप ओळख पटलेली नाही, असेही झेलेन्स्की यांनी सांगितले. तर दुसरीकडे, या हल्ल्यांमध्ये देशभरात जवळपास २० लोकांचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाल्याचे समजते, असे युक्रेनचे गृहमंत्री इहोर क्लिमेन्को यांनी सांगितले.
दोन वर्षांपासून सुरू असलेले युक्रेन-रशिया युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही. दोन्ही देश एकमेकांवर सतत हल्ले करत आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ ला सुरू झालेले युद्ध आजतागायत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. आतापर्यंत युक्रेनमधील १० हजार लोकांचा या युद्धात मृत्यू झाला आहे, तर १८,५०० लोक जखमी झाले आहेत. रशियानेही ३.९२ लाख सैनिक गमावल्याचा युक्रेनचा दावा आहे.
युक्रेनमध्ये ब्लॅकआउट रशियन हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये ब्लॅकआउट आहे. वीज निर्मिती कंपनीने एका निवेदनात म्हटलं आहे की, रशियन हवाई हल्ल्यामुळे लोकांचा आपत्कालीन वीजपुरवठाही खंडित झाला आहे. प्लांटमध्ये झालेल्या स्फोटामुळे वीज यंत्रणा कोलमडली असून, त्यामुळे सुमारे एक लाख लोक विजेशिवाय जगत आहेत. रशिया सतत वीज प्रकल्पांना लक्ष्य करत आहे.