मॉस्को : भारत आणि चीनमध्ये पूर्व लडाखमधील सीमेवरून सुरू असलेला तणाव आता निवळेल, असे म्हटले जात आहे. कारण, भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट झाल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (गुरुवार) राज्यसभेत सांगितले. यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने गतवर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीत ४५ चिनी सैनिक मारले गेले होते, असा दावा केला आहे. (russian news agency claims that china lost 45 soldiers during galwan valley clashes with india)
गतवर्षी १५ जून २०२० रोजी भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे २० जवान शहीद झाले होते. चीनकडून मात्र त्यांच्या सैनिकांबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती. भारत-चीन सीमेवरून तोडगा निघाल्यानंतर आता रशियाच्या एका वृत्तसंस्थेने या प्रकरणी ४५ चिनी सैनिक मारले गेल्याचा दावा केला आहे.
भारत आणि चीनमध्ये सीमेवरून समेट; राजनाथ सिंह यांची राज्यसभेत घोषणा
भारत आणि चीन सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर दोन्ही देशांचे सुमारे ५० हजार सैनिक सीमेवर तैनात करण्यात आले होते. भारत आणि चीन यांच्यातील सैन्य स्तरीय चर्चा सुरू झाल्यानंतर चीनने गलवान खोऱ्यातील झटापटीत पाच सैनिक मारले गेले होते, असे कबूल केले होते. मात्र, अमेरिका आणि भारतीय गुप्तचर विभागाच्या अंदाजानुसार, गलवान खोऱ्यातील हिंसक झटापटीत चीनचे किमान ४० सैनिक मारले गेले होते. यानंतर आता रशियाच्या वृत्तसंस्थेने केलेल्या दाव्यानंतर पुन्हा हा विषय चर्चिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये पँगाँग सीमेवरून सहमती झाली आहे. एप्रिल २०२० च्या पूर्वीची स्थिती कायम ठेवली जाणार आहे. चीनने आतापर्यंत या भागात केलेले बांधकाम जमीनदोस्त केले जाणार आहे, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. भारत-चीन तणावादरम्यान ज्या जवानांनी हौतात्म्य पत्करले, त्यांना देश सलाम करेल. देशाच्या अखंडतेसाठी संपूर्ण संसद एकसंध असल्याचेही राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बोलताना नमूद केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकच्या फिंगर ४ येथे दोन्ही देशांकडून पेट्रोलिंग केली जाणार नाही. या भागाला 'नो पेट्रोलिंक झोन' म्हणून घोषित करण्यात आले आहे. चिनी सैन्य फिंगर ८ आणि भारतीय सैन्य धन सिंह थापा पोस्ट म्हणजेच फिंगर २ वरून फिंगर ३ वर मागे येणार आहे.