युक्रेनमधील मारियुपोल शहरावर रशियाचा कब्जा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 08:16 AM2022-04-22T08:16:05+5:302022-04-22T08:17:00+5:30
युक्रेनच्या पूर्वेकडील भागाला असलेल्या मारियुपोल शहरात अझोव्हत्सल हा मोठा स्टील प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा परिसर वगळता शहराचा उर्वरित भाग युक्रेनच्या सैनिकांच्या तावडीतून ‘मुक्त’ करण्यात आल्याचा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू यांनी केला.
कीव्ह : गेल्या ५० हून अधिक दिवसांपासून जंग जंग पछाडूनही युक्रेनच्या एकाही शहरावर ताबा मिळवता येऊ न शकलेल्या रशियन सैन्याला मारियुपोल या शहरावर कब्जा मिळवण्यात यश आले आहे. या शहरावर आपल्या शूर सैनिकांनी नियंत्रण मिळवले असल्याचा दावा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला असून शहराचा वेढा आणखी घट्ट करण्याचे आदेश त्यांनी सैनिकांना दिले आहेत. मारियुपोलमध्ये अडकलेल्या नागरिकांना घेऊन फक्त चार बस गुरुवारी तिथून बाहेर पडू शकल्या अशी माहिती युक्रेनकडून देण्यात आली.
युक्रेनच्या पूर्वेकडील भागाला असलेल्या मारियुपोल शहरात अझोव्हत्सल हा मोठा स्टील प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा परिसर वगळता शहराचा उर्वरित भाग युक्रेनच्या सैनिकांच्या तावडीतून ‘मुक्त’ करण्यात आल्याचा दावा रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई शोईगू यांनी केला. काही वर्षांपूर्वी रशियाने क्रिमिया गिळंकृत केला. आता मारियुपोलवर कब्जा केल्यास तो भाग क्रिमियाला जोडण्याचा रशियाचा विचार असल्याचे समजते. त्यामुळे डोन्बास किंवा अन्य ठिकाणी आपल्या फौजा हलविणे रशियाला सहज शक्य होणार आहे. मारियुपोलमधील हजारो नागरिकांपैकी फक्त चार बस भरतील इतक्याच नागरिकांना गुरुवारी सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. तेथील नागरिकांच्या सुटका करण्याच्या प्रयत्नांत रशिया वारंवार अडथळे आणत असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. या शहरावरील हल्ल्यांत आजवर २० हजार नागरिक ठार झाले असण्याचा अंदाज आहे.
अमेरिकेकडून युक्रेनला मदत
- अमेरिकेने युक्रेनला अतिरिक्त ३८ अब्ज रुपयांची मदत देण्याचे ठरविले आहे.
- युक्रेनमधील कर्मचाऱ्यांचे पगार, पेन्शन, तसेच शासकीय योजनांसाठी हा पैसा खर्च करण्यात येईल.
- रशियाने लादलेल्या युद्धामुळे युक्रेनची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. त्यामुळे जगातील देशांनी मदत करावी, असे आवाहन युक्रेनने केले होते.
अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
रशियाने आंतरखंडीय मारा (आयसीबीएम) करू शकणाऱ्या सरमट नावाच्या एका अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची बुधवारी यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्राद्वारे जगातील कोणत्याही लक्ष्यावर अचू्क हल्ला चढविता येईल, असे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी म्हटले आहे. सरमट क्षेपणास्त्रावर १० किंवा त्याहून अधिक वॉरहेड्स लावता येऊ शकतात.
स्पेन, डेन्मार्कचे प्रमुख नेते युक्रेनला जाणार
स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ, डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटी फ्रेडरिकसन हे दोन नेते येत्या काही दिवसांत युक्रेनमध्ये जाऊन अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शविणार आहेत.
याआधी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन व तसेच इतर काही देशांच्या प्रमुख नेतेही युक्रेनच्या दौऱ्यावर गेले होते.