रशियाकडून युद्धविरामाची घोषणा, दोन दिवसांसाठी युक्रेनविरुद्धचं युद्ध थांबणार; जाणून घ्या कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 11:09 PM2023-01-05T23:09:22+5:302023-01-05T23:10:47+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धात दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. या संबंधीचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेन विरुद्धच्या युद्धात दोन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. या संबंधीचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे. ७ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या पारंपरिक ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही देशांदरम्यान सुरू असलेल्या युद्धात ६ आणि ७ जानेवारीला रशियाकडून कोणतीही आक्रमता होणार नाही. ही माहिती रशियन मीडिया आउटलेटने प्रसिद्ध केली आहे.
पुतीन यांच्या म्हणण्यानुसार, "रशियन ऑर्थोडॉक्स बिशपांनी ख्रिसमस युद्धविरामाची मागणी केली आहे जेणेकरून लोक ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आणि ख्रिस्ताच्या जन्माच्या दिवशी कार्यक्रमांना उपस्थित राहू शकतील". पुतीन यांच्या आदेशानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी अद्याप या युद्धबंदीवर जाहीरपणे भाष्य केलेलं नाही. आदल्या दिवशी त्यांच्या कार्यालयातील सल्लागाराने रशियन ऑर्थोडॉक्स चर्चने पुकारलेल्या युद्धबंदीला "निंदक सापळा" म्हटले होतं.