Vladimir Putin Mongolia Visit : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी मंगोलियाला भेट दिली. व्लादिमीर पुतिन यांच्या मंगोलिया दौऱ्याची खूप चर्चा होत आहे, कारण आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्याचे आदेश मंगोलियन सरकारला दिले होते. मात्र, मंगोलियात व्लादिमीर पुतिन यांना गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्लादिमीर पुतिन यांनी चीनलाही धक्का दिला आहे. रशिया शस्त्रास्त्रांपासून लष्करी प्रशिक्षणापर्यंत सर्व काही मंगोलियाला पुरवेल, अशी घोषणा व्लादिमीर पुतिन यांनी केली आहे.
व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेनंतर चीनचा पारा चढला आहे. कारण भारताप्रमाणेच चीनचाही मंगोलियासोबत सीमावाद आहे. यावरून अनेक वादही झाले आहेत. व्लादिमीर पुतिन यांच्या घोषणेबाबत रशियाचे उप संरक्षण मंत्री अलेक्झांडर यांनी सांगितले की, मंगोलियाला शस्त्रे आणि लष्करी उपकरणे पुरवली जातील. याशिवाय, दुरुस्तीसह इतर बाबींमध्येही मदत केली जाणार आहे. तसेच, आतापर्यंत ३४० सैनिकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, असे अलेक्झांडर यांनी सांगितले,
मंगोलियाच्या दौऱ्यादरम्यान व्लादिमीर पुतिन यांनी मंगोलियाचे अध्यक्ष उखनागिन खुरेलसुख यांच्याशीही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. व्लादिमीर पुतिन म्हणाले की, मंगोलिया आणि रशियामधील संबंध प्रगतीपथावर आहेत. रशिया आणि मंगोलिया दहशतवादविरोधी कारवायांमध्येही सहकार्य करत आहेत. तसेच, व्लादिमीर पुतिन यांनी मंगोलियाला गॅस क्षेत्रातही मदत देऊ केली. दरम्यान, रशिया मंगोलियाला मोठ्या प्रमाणावर गॅस आणि वीज पुरवतो.
व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्याचे दिले होते आदेश गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यांच्यावर युद्ध गुन्ह्यांचा आरोप होता. युक्रेनमधून बेकायदेशीरपणे मुलांना रशियात पाठवल्याबद्दल न्यायालयाने व्लादिमीर पुतिन यांना जबाबदार धरले होते. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने हल्ला केला, तेव्हा युक्रेनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, मंगोलिया हा आयसीसीचा सदस्य देश आहे, परंतु असे असूनही मंगोलियाने आयसीसीचा आदेश पाळला नाही.