मॉस्को – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी नाझी सैन्याचा संसदेत सन्मान करणाऱ्या कॅनडाला फटकारले आहे. कॅनडाचे हे पाऊल मूर्खपणा आहे असं पुतिन यांनी म्हटलं. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर हत्येत भारत सरकारचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला. त्यामुळे भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेलेत अशावेळी पुतिन यांनी कॅनडावर शरसंधान साधणे हे महत्त्वाचे मानले जात आहे.
मागील वर्षी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की कॅनडाला पोहचले होते. तिथे त्यांनी कॅनडाच्या संसदेला संबोधित केले. यावेळी जागतिक महायुद्धात एडॉल्फ हिटलर यांच्या बाजूने लढणारे नाझी सैनिक यारोस्लाव हुंका यांना बोलवण्यात आले होते. कॅनडाचे स्पीकर एंथनी रोटा यांनी हुंका यांना खरे नायक असल्याचे म्हटलं. त्यानंतर कॅनडातील खासदारांनी उभं राहून टाळ्या वाजवून नाझी सैनिकाचा सत्कार केला.
नाझी सैनिकाचा सन्मान केल्यावरून पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्यावर अनेक देशांनी टीका केली होती. त्यामुळे कॅनडाच्या स्पीकरला राजीनामा देणे भाग पाडले होते. आता पुतिन यांनीही कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिकाच्या झालेल्या सत्कारावरून निशाणा साधला. पुतिन म्हणाले की, चला मानू की, तुम्ही त्या नाझी सैनिकाला ओळखत नव्हता. परंतु हिटलर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी युद्धावेळी रशियाच्याविरोधात लढाई केली होती हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही मूर्ख आहात. याचा अर्थ तुम्ही शाळेत गेला नसाल असं त्यांनी म्हटलं.
त्याचसोबत नाझी सैनिकाचे कौतुक करण्याचा मूर्खपणा त्यांनी केला. विशेष म्हणजे यूक्रेनचे राष्ट्रपती ज्यांच्या नसात यहुदी रक्त वाहतंय असं व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं. तर कॅनडाचे उपपंतप्रधान क्रिस्टिया फ्रीलँड यांना याबाबत विचारले असता त्यांनी माजी स्पीकरची भयानक चूक असून रशियाने त्याचा फायदा उचलायला नको असं सांगितले आहे.
दरम्यान पुतिन यांनी भारताचे कौतुकही केले आहे. भारताच्या सार्वभौम धोरणाचे पुतिन यांनी कौतुक केले. G-20 चे भारताचे अध्यक्षपद यशस्वी निभावल्याचे सांगितले. भारत यशस्वी झाला कारण भारताने जी-20 अजेंड्यावर राजकारण केले नाही. भारताला रशियापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न निष्फळ आहेत, भारत हे स्वतंत्र राज्य आहे असंही पुतिन यांनी म्हटलं आहे.