"भारताला लुटलं तसंच आता रशियालाही लुटू पाहतायत..," पाश्चात्य देशांवर पुतीन यांचा जोरदार निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2022 06:14 AM2022-10-01T06:14:22+5:302022-10-01T06:14:52+5:30
क्रेमलिन येथे आयोजित एका कार्यक्रमात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी आपल्या देशात डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन यांचा समावेश करण्यासाठी अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी केली.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) युक्रेनच्या चार भागांना रशियाचा अधिकृत भाग म्हणून घोषित केले. क्रेमलिनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन यांना रशियात समाविष्ट करण्यासाठी अधिकृत दस्तऐवजावर स्वाक्षरी केली. कार्यक्रमाला संबोधित करताना पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर जोरदार निशाणा साधला.
यादरम्यान त्यांनी युक्रेनसोबत पुन्हा चर्चा करण्याबाबतही वक्तव्य केलं. मात्र, चर्चेदरम्यान ताब्यात घेतलेल्या भागांवर चर्चा होणार नाही, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दुसरीकडे युक्रेनने रशियाचा प्रस्ताव फेटाळून लावला असून पुतीन जोपर्यंत राष्ट्राध्यक्ष राहतील तोपर्यंत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे म्हटले आहे. यादरम्यान पुतीन यांनी भारताचा उल्लेख करत भारताला लुटल्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांना रशियाला त्यांची वसाहत बनवायचे असल्याचेही म्हटले.
पाश्चात्य देशांवर आरोप
आपल्या भाषणादरम्यान पुतीन यांनी पाश्चात्य देशांवर रशियाला कमकुवत आणि विघटित केल्याचा आरोप केला. पाश्चिमात्य देशांनी मध्ययुगात आपली वसाहतवादी सत्ता सुरू केली. अमेरिकेतील लोकांची कत्तल, भारत आणि आफ्रिकेची लूट, चीनविरुद्ध युद्ध. पाश्चिमात्य देशांनी संपूर्ण देशाला अंमली पदार्थांवर अवलंबून ठेवत संपूर्ण समूहांची कत्तल केली. त्यांनी प्राण्यांप्रमाणे माणसांची शिकार केली. या सर्वांसाठीच पाश्चात्य देशांना रशियाला वसाहत बनवायचं आहे. आम्हाला अभिमान वाटतो की २० व्या शतकात आपल्या देशानं वसाहतविरोधी चळवळीचे नेतृत्व केलं, ज्यामुळे अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले," असं पुतीन म्हणाले.
गॅस पाईपलाईनची तोडफोड
पुतीन यांनी पाश्चिमात्य देशांवर जर्मनीतील रशियन गॅस पाइपलाइनची तोडफोड केल्याचा आरोप केला. पाश्चिमात्य देश रशियाला कमकुवत करण्याची नवीन संधी शोधत आहे. आपला देश इतका मोठा आहे हे सत्य ते पचवू शकत नसल्याचंही त्यांनी सांगितलं.डोनेस्तक, लुहान्स्क, झापोरिझिया, खेरसन येथील लोक आता रशियन नागरिक झाले असल्याचेही पुतीन म्हणाले. त्यांच्यावर हल्ला झाल्यास तो रशियावरील हल्ला मानला जाईल. रशिया आपल्या नागरिकांचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रतिकार करले असा इशाराही त्यांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"