Vladimir Putin on Make In India: गेल्या काही वर्षांत मेक इन इंडिया या गोष्टीवर अधिक भर देण्यात आला आहे. मेक इन इंडिया ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन या मेक इन इंडियाचे चाहते झाले आहेत. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले असून, यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा सकारात्मक परिणाम झाल्याचे म्हटले आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मित्र म्हणून कौतुक केले आहे. रशियातील देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी भारताचे उदाहरण दिले. 'मेक इन इंडिया' संकल्पनेचे कौतुक करताना पुतिन म्हणाले की, भारताला त्याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. युक्रेन युद्धानंतर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचा रशियन बाजारावर कोणताही परिणाम झालेला नाही, असा दावा पुतिन यांनी केला आहे.
'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर
रशिया-युक्रेन युद्ध अद्यापही सुरूच आहे. यामुळे रशियाला मोठ्या प्रमाणात कठोर आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. या निर्बंधांमुळे रशियाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. उद्योग-व्यवसायांसाठीच्या बाजारपेठा बंद झाल्या आहेत. अशा परिस्थितीत राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, भारताच्या 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यात यावा आणि आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देशातच तयार केल्या जाव्यात, असे मत व्यक्त केले आहे. आमचे मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मेक इन इंडिया'ची संकल्पना सुरू केली होती. याचे सकारात्मक परिणाम भारताला मिळाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मेक इन इंडिया' संकल्पनेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर 'स्पष्ट परिणाम' झाला आहे, या शब्दांत पुतिन यांनी मेक इन इंडिया संकल्पना आणि पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले आहे.
दरम्यान, युक्रेन युद्धानंतर अमेरिकेसह युरोपीय देशांनी लादलेल्या आर्थिक निर्बंधांचा या देशावर काहीही परिणाम झालेला नाही. यामुळे रशियन बाजारपेठेत घसरण झाली नाही, असा दावा करताना पुतिन म्हणाले की, देशातून पाश्चिमात्य कंपन्या निघून गेल्याने रशियन उद्योजकांच्या संधी वाढल्या आहेत. देशांतर्गत उत्पादने आणि ब्रँडला प्रोत्साहन देण्यासाठी रशियाला नवीन धोरणाची गरज असल्याचे ते म्हणाले.