पुतीन यांच्या राईटहँडच्या मुलीची लँड क्रूझर बॉम्बने उडविली; मॉस्कोजवळ हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 08:36 AM2022-08-21T08:36:59+5:302022-08-21T08:37:13+5:30
ब्रिटनने रशियाच्या लोकांवर लादलेल्या निर्बंधांमध्ये डारिया डुगिनचा समावेश करण्यात आला होता. ती लेखिका होती.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या सहकाऱ्यांना धक्के बसू लागले आहेत. युक्रेन युद्धात अनेक सहकारी कमांडर मारले गेले आहेत. काही दिवसांपूर्वीच युक्रेन युद्धासाठी महत्वाचा असा एअरबेसच उडवून दिल्याने रशियन सैन्याला मोठा धक्का बसला आहे. असे असताना आता पुतीन यांचा राईट हँड समजल्या जाणाऱ्या मुत्सद्दीच्या मुलीची कार बॉम्बने उडवून देत हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अलेक्झांडर डुगिन यांची मुलगी डारिया हिची हत्या करण्यात आली आहे. डारियाही आपल्या लँड क्रूझर प्राडे कारमधून घरी जात होती, तेव्हा तिच्या कारला मॉस्कोजवळ बॉम्बस्फोट करून उडवून देण्यात आले. स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर त्यांच्यामागोमाग अलेक्झांडरदेखील तिथे पोहोचले.
रशियन मीडियानुसार मॉस्कोच्या ओडिंट्सोवस्की जिल्ह्यात कारवर बॉम्ब टाकण्यात आला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या कारमध्ये डारिया असल्याचे समोर आले आणि मॉस्कोपर्यंत या स्फोटाची झळ पोहोचली. रस्त्यात अचानक स्फोट झाल्याने आगीचे लोळ उठले होते. यामुळे वाहतूक अचानक थांबली होती. कार पूर्णपणे उध्वस्त झाली होती.
ब्रिटनने रशियाच्या लोकांवर लादलेल्या निर्बंधांमध्ये डारिया डुगिनचा समावेश करण्यात आला होता. ती लेखिका होती. अलेक्झांडर डुगिन हे प्रसिद्ध रशियन राजकीय तत्वज्ञानी आणि विश्लेषक आहेत. क्रिमिया आणि युक्रेन युद्धामागे त्यांचा हात असल्याचे बोलले जाते. अलेक्झांडरला पाश्चात्य विश्लेषकांनी पुतीनचा मेंदू म्हणून संबोधले होते. आतापर्यंत रशियन अधिकाऱ्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सरकारमध्ये अधिकृत पद नसतानाही, डुगिनचे वडील रशियन राष्ट्राध्यक्षांचे जवळचे सहकारी आहेत.