कीव्ह : युक्रेनच्या हवाई हल्ल्यात आपल्या जहाजाचे नुकसान झाले आहे, असे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सांगितले. ही घटना क्रिमियात घडली. फिओडोसिया शहरातील तळावर असलेल्या रशियाई नौदलाच्या नोवोचेरकास्क या जहाजावर युक्रेनच्या विमानांनी क्षेपपणास्त्रांचा मारा केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत आमच्या लष्कराने युक्रेनची दोन लढाऊ विमाने नष्ट केली, असेही मंत्रालयाने सांगितले. तथापि, युक्रेनने हा दावा फेटाळला आहे.
गेल्या काही महिन्यांत युक्रेनच्या सैन्याने क्रिमियाभोवती अनेक हल्ले केले आहेत. यात बहुतांश करून सागरी ड्रोनचा वापर करण्यात आला. रशियाने नियुक्त केलेले क्रिमियाचे प्रमुख सर्गेई अक्स्योनोव्ह यांनी या हल्ल्यात एक जण ठार झाल्याचे सांगितले.
युक्रेनच्या वृत्तवाहिन्यांवर प्रसारित व्हिडीओंमध्ये बंदर परिसरात मोठी आग दिसून आली. एवढेच नाही तर युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी जहाज नष्ट झाल्याचा दावाही केला. हे जहाज ड्रोनसह दारुगोळा घेऊन जात असल्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. ‘स्फोट किती शक्तिशाली होते हे आम्ही पाहिले. अशा स्थितीत टिकून राहणे जहाजासाठी अत्यंत कठीण आहे,’ असे युक्रेनच्या हवाई दलाचे प्रवक्ते युरी इहनत यांनी सांगितले. या हल्ल्यादरम्यान युक्रेनची विमाने पाडल्याचा रशियाचा दावा इहनत यांनी फेटाळला. (वृत्तसंस्था)