ही तर आणखी कमवण्याची संधी...; अमेरिकेने युक्रेनला रणगाडे देताच रशियन सैनिक खुश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 06:49 PM2024-03-04T18:49:47+5:302024-03-04T18:50:07+5:30
रशियन सैनिकाने थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना ऑफर केलं कमिशन
Russia Ukraine War, America: युक्रेन-रशिया युद्ध आता तिसऱ्या वर्षीही सुरूच आहे. परंतु दोन्ही देश युद्धाचे उद्दिष्ट साध्य करू शकलेले नाहीत. युक्रेनच्या शहरांमध्ये रशियन सैनिकांची कूच करतानाची अनेक छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. पण अलीकडेच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ फिरत आहे ज्यामध्ये रशियन सैनिक युक्रेनला अब्राम टँक दिल्याबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांचे आभार मानत आहेत. याशिवाय, व्हिडिओमध्ये सैनिक असेही म्हणत आहे की युक्रेनला अब्राम टँक देऊन अमेरिकेने त्यांना अधिक पैसे कमविण्याची संधी दिली.
व्हिडिओमध्ये एक रशियन सैनिक दावा करताना दिसत आहे की त्याला अमेरिकन टँक नष्ट करण्यासाठी जास्त पैसे मिळत आहेत. क्लिपमध्ये, सैनिक इंग्रजीमध्ये म्हणत असल्याचे दिसत आहे की, आम्ही रशियन सैनिक अब्राम टँकसाठी तुमच्याकडे (बायडन) आनंद व्यक्त करतो. या टँकमुळे, रशियन सैनिकांना अधिक कमाई करण्याची संधी मिळत आहे. प्रत्येक पाश्चिमात्य उपकरणे नष्ट करण्यासाठी सैनिकांना बोनस ऑफर केला जात असल्याचे ते व्हिडिओमध्ये सांगत आहेत. युक्रेनला दिलेले रणगाडे कमी आणि सैनिकांचा खर्च जास्त आहे, त्यामुळे बायडेन यांनी युक्रेनला अधिक रणगाड्यांचा पुरवठा करावा, असा टोला तो सैनिक लगावताना दिसत आहे.
सैनिकाने ट्रोल करत बायडन यांना ऑफर केलं कमिशन
अमेरिकेने जानेवारी २०२३मध्ये युक्रेनला ३१ अब्राम टँक देण्याची घोषणा केली होती. मात्र फेब्रुवारी अखेरपर्यंत टँक देण्यात आले नाहीत. सैनिकाने असा दावा केला की युक्रेनमध्ये प्रत्येक रशियन सैनिकाला बोनस मिळण्याइतपत अमेरिकन टँक नाहीत. व्हिडिओमध्ये, बायडन यांना त्यांच्या बोनसच्या १०% कमिशनची ऑफर देखील देण्यात आली आहे. या सैनिकाने अमेरिकन टँकच्या पुरवठ्याचीही खिल्ली उडवली आणि सांगितले की अध्यक्ष बायडन यांना MIR डेबिट कार्ड मिळावे जेणेकरून ते रशियन सैनिकांना सहज पैसे पाठवू शकतील.