माझ्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढायला सांगितले; युक्रेनियन महिलेने सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 02:06 PM2022-03-29T14:06:41+5:302022-03-29T14:07:01+5:30

रशियन सैनिकांनी युक्रेनियन महिलवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

Russian soldiers accused again of sexually assaulting Ukrainian women | माझ्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढायला सांगितले; युक्रेनियन महिलेने सांगितली आपबीती

माझ्यावर बंदूक रोखली अन् कपडे काढायला सांगितले; युक्रेनियन महिलेने सांगितली आपबीती

Next

रशियाचा युक्रेनवर हल्ला सुरुच आहे. बॉम्ब हल्ला, क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनमधील अनेक नागरिक मारले जात आहेत. अनेक शहरं उदध्वस्त झाली असून मारियुपोल शहरात सर्वात वाईट परिस्थिती आहे. मारियुपोल शहरामधील संपर्क सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. अनेक लोकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. 

रशियन सैन्याकडून युक्रेनमधील नागरिकांना मारहाण करत असल्याचा आरोप सोशल मीडियाद्वारे युक्रेनच्या रहिवाशांनी केला आहे. याचदरम्यान एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. रशियन सैनिकांनी युक्रेनियन महिलवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

रशियन सैनिकांनी एका महिलेच्या पतीला गोळ्या घालून ठार केले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून माझ्यावर आळीपाळीने बलात्कार केला, असा दावा एका युक्रेनियन महिलेने केला आहे. महिलेची आपबीती ऐकून युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

पीडित महिला म्हणाली की, दोन रशियन सैनिक आमच्या घरात घुसले. त्यानंतर माझे पती कुठेय? अशी विचारणा करत मी बाहेर बघितले त्यावेळी माझे पती दाराजवळ पडले होते. त्यांनी माझ्या पतीला गोळी घालून ठार केले होते, असं पीडितेनं सांगितलं.

पीडित महिला पुढे म्हणाली की, बंदुकधारी सैनिकांना पाहून माझा चार वर्षांचा मुलगा घाबरून रडत होता. त्याला खोलीत बंद केले आणि माझ्यावर बंदूक रोखली. मला कपडे काढायला सांगितले. त्यानंतर दोघांनी एकामागून एक माझ्यावर बलात्कार केला. ओरडल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. माझा मुलगा बंद खोलीत रडत होता याची त्यांना काहीही पर्वा नव्हती. मी मुलाकडे जाण्यासाठी धडपडत होते, असं पीडित युक्रेनियन महिलेने सांगितले. 

आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू-

रशियाने सुरू केलेल्या युद्धात युक्रेनमध्ये आतापर्यंत १४३ बालकांचा मृत्यू झाला असून, २१६ जण जखमी झाले आहेत. या संख्येमध्ये नजीकच्या काळात आणखी वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रशियाने युक्रेनमधील कीव्ह, लविव्ह, खारकीव अशा अनेक शहरांतील लष्करी ठिकाणांबरोबरच निवासी भाग, तसेच शाळा, रुग्णालयांवरही बॉम्बहल्ले केले आहेत. त्यात काही हजार नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यांचा अमेरिका, युरोपसह अनेक देशांनी तीव्र निषेध केला आहे. मात्र, त्याची पर्वा न करता, रशियाने अद्याप युद्ध सुरूच ठेवले आहे. 

युक्रेनची फाळणी करण्याचा डाव?-

कोरियाचे उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया असे विभाजन झाले आहे. त्या धर्तीवर युक्रेनचे पूर्व युक्रेन व पश्चिम युक्रेन अशी फाळणी करण्याचा डाव रशियाने रचल्याचा दावा युक्रेन लष्कराच्या गुप्तचर विभागाने केला आहे. रशिया आपल्या सीमेपासून क्रिमियापर्यंत लँड कॉरिडॉर बनविण्याच्या प्रयत्नात आहे, असेही युक्रेनने म्हटले आहे.

Web Title: Russian soldiers accused again of sexually assaulting Ukrainian women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.