Russia Ukraine War: 'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 06:01 PM2022-03-03T18:01:03+5:302022-03-03T18:02:17+5:30
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे.
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले होत आहेत. युद्धाचा आज आठवा दिवस सुरू असून युक्रेन अजूनही रशियन फौजांचा प्रतिकार करत आहे. यामागचं मोठं कारण म्हणजे युक्रेनचं लष्कर सातत्यानं रशियन हल्ल्याला जशास तसं उत्तर देत आहेत. यातच आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियन सैन्याला जीवाची पर्वा करत असाल तर माघारी जाण्याचं इशारा दिला आहे.
झेलेन्स्की यांनी कणखर भूमिका घेत रशियन सैन्याला उद्देशन सांगितलं की तुम्हाला जर जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा. तुम्ही कुठंही लपून राहिलात तर तुम्हाला शोधून काढलं जाईल आणि जीवानिशी मारलं जाईल, असा रोखठोक इशारा दिला आहे. युद्धानंतर आम्ही देशाच्या पुनर्निर्माणाची शपथ घेतली आहे आणि आजच्या परिस्थितीची किंमत रशियाला चुकवावी लागेल, असं झेलेन्स्की म्हणाले. तसंच रशियानं पुकारलेल्या युद्धामुळे युक्रेनचं झालेलं नुकसानाची भरपाई रशियाला करावीच लागेच असंही ते म्हणाले.
"आम्ही प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता, गल्ली आणि शहर झोकून देऊ. रशियन सैनिकांच्या मृतदेहांनी युक्रेन झाकलं जावं अशी आमची इच्छा नाही. त्यामुळे शेवटचं सांगतोय माघारी परता. गेल्या आठवड्याभरात आम्ही रशियाचे ९ हजार सैनिक मारले आहेत. त्यामुळे रशियानं माघार घ्यावी हेच संयुक्तिक ठरेल", असं झेलेन्स्की म्हणाले.
"दोन महायुद्ध, तीन दुष्काळ, प्रलय, द ग्रेट पर्ज, चर्नोबिल स्फोट आणि क्रिमियावरील कब्जा यानंतरही युक्रेननं उभारी घेतली आहे. आम्ही वेळोवेळी नव्यानं उभे राहिलो आहोत. आम्हाला नष्ट करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला आहे. पण असं होऊ शकलेलं नाही. आम्ही प्रत्येकवेळी कमबॅक करत विजय प्राप्त केला आहे. जर कुणी विचार करत असेल की आम्ही युक्रेनियन घाबरुन जाऊ आणि कोसळून पडू किंवा आत्मसमर्पण करू, तर असे लोक आम्हाला ओळखूच शकलेले नाहीत", असंही झेलेन्स्की म्हणाले.