Russian Soldiers in Ukraine War : हवे तेवढे सैन्य पाठवा, युक्रेन कधीच ताब्यात येणार नाही! रशियन सैनिक पुतीन यांच्यावर संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 10:19 AM2022-03-21T10:19:50+5:302022-03-21T10:20:10+5:30
Russian Soldiers Press Conference: न्यूज एजन्सी इंटरफॅक्सने युक्रेनसोबत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये रशियन सैनिक आले होते. त्यांनी पुतीन यांच्याविरोधाच आवाज उठविला.
कीव्ह : युक्रेन दोन दिवसांत ताब्यात घेण्याच्या रशियाच्या मनसुब्यांना सुरुंग लागला आहे. युद्ध सुरु झाल्यापासून रशियन सैन्याची झालेली वाताहात अनेकदा माध्यमांद्वारे समोर आली आहे. निराश झालेले हे सैनिक आता घरी परतण्याची इच्छाव्यक्त करू लागले आहेत, असे दावे करण्यात आले आहेत. यासाठी ते स्वत:वर गोळी झाडून घेण्यासही तयार आहेत.
युक्रेनने पकडलेल्या रशियन सैनिकांनी पुतीन विरोधात आवाज उठविण्यास सुरुवात केली आहे. तसेच लोकांनाही त्यांनी धोका झाल्याचे म्हटले आहे. युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांना सामुहिक कबरींमध्ये दफन केले जात असल्याचा आरोप या सैनिकांनी केला आहे.
न्यूज एजन्सी इंटरफॅक्सने युक्रेनसोबत एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये रशियन सैनिक आले होते. त्यांनी पुतीन यांच्याविरोधाच आवाज उठविला. द मिररनुसार अलेक्सी जेलेज़्नाक, मुस्तफ़ेव मुगसाद, इगोर रुडेंको, अलेक्जेंडर फोमेंको आणि इतर सैनिक या पत्रकार परिषदेवेळी भावूक झाले. यावेळी जेलेज़्नाकने पुतीन यांना इशारा दिला आहे.
पुतीन एक खोटारडे आणि धोकेबाज व्यक्ती आहेत. त्यांनी युक्रेनच्या शहरे, हॉस्पिटल आणि नागरिकांवर बॉम्ब टाकले आहेत. रशियाच्या नागरिकांनो युक्रेनची जनता खूप शूर आहे. ते रशियन शस्त्रास्त्रांना निशस्त्र होऊन देखील थोपवू शकतात. कारण ते एकजूट आहेत. पुतीन यांनी कितीही सैन्य पाठविले तरी ते कदापी युक्रेन ताब्यात घेऊ शकणार नाहीत. आपले कमांडर खोटारडे आहेत. त्यांनी आमच्यासोबतच नाही तर रशियासोबत धोका केला आहे, असा आरोप जेलेज़्नाकने केला आहे.
रशियन सैनिक मुगसादने आपल्या देशातील नागरिकांना म्हटले की पुतीन यांच्या प्रचाराकडे दुर्लक्ष करावे. जग आपण ज्या आक्रमकतेने हल्ले केले, ते अनेक शतके विसरणार नाही. एका दिवसात युक्रेनच्या लोकांचे शांत जगणे नष्ट केले. रशियन सैनिक आधीच हरले आहेत, त्यांना युक्रेनी सैन्य उद्ध्वस्त करणार आहे, असा इशारा दिला आहे.