रशिया आणि युक्रेनमधील वाद आता चिघळला आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे. रशिया युक्रेनमध्ये हल्ले करत असून आगामी काळात क्षेपणास्त्र हल्ल्यांची संख्या वाढण्याची भीती आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील सामान्य लोकही रशियन हल्ल्याचे बळी ठरले आहेत. याशिवाय रशिया युक्रेनचे अनेक लष्करी तळ नष्ट करण्याचा दावा करत आहे. युक्रेनमध्ये आता सामान्य नागरिकही युद्धासाठी तयार झाले आहेत. युक्रेनच्या रस्त्यांवर मोठमोठ्या रांगा लागल्या आहेत. त्यांना शस्त्रे पुरविली जात आहेत. अशातच त्यांना आणखी शस्त्रे, बंदुकांची गरज लागणार आहे. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविली आहेत त्यात ही वाढीव मदत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जाहीर केली आहे.
युक्रेनमध्ये भीषण परिस्थिती आहे. युद्ध पेटलेलं असताना आता आणखी एक नवीन मोठं संकट निर्माण झालं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील भीती व्यक्त केली आहे. युक्रेनमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) इशारा दिला आहे की, कीव्हसह इतर शहरांतील रुग्णालयांमध्ये तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास परिस्थिती अत्यंत धोकादायक बनू शकते. डब्ल्यूएचओच्या मते, युक्रेनमध्ये 600 रुग्णालये आहेत. तेथे अजूनही 1700 कोरोनाचे रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत.
युक्रेनमध्ये विजेचाही तुटवडा
WHO ने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांव्यतिरिक्त युक्रेनमधील नवजात, गर्भवती महिला आणि वृद्धांनाही वेळोवेळी ऑक्सिजनची गरज भासू शकते. युद्धाच्या काळात लोकांच्या मनस्थितीवर परिणाम झाल्याने परिस्थितीही चिंताजनक बनली आहे. कठीण परिस्थितीमुळे तेथील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा जवळपास संपला आहे. ऑक्सिजन जनरेटर प्लांटमधून रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात समस्या येत आहेत. रशियाने युक्रेनवर सुरू केलेल्या हल्ल्यांचा आजचा पाचवा दिवस आहे. देशभरात आलेल्या या संकटाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे.
आरोग्य सेवांवरही गंभीर संकट
रुग्णालयांवर म्हणजेच आरोग्य सेवांवरही गंभीर संकट निर्माण झाले आहे. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असताना त्यांच्यावर गोळीबार होण्याचा धोकाही वाढला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अमेरिकेने युक्रेनला युद्धासाठी मोठी मदत केली आहे. फ्रान्सकडून शस्त्रास्त्रांचा साठा युक्रेनच्या दिशेने रवाना झाला आहे. अशातच युक्रेनला रशियासोबत लढण्यासाठी आणखी शस्त्रास्त्रांची तसेच दारुगोळ्याची गरज भासणार आहे. त्यातच युक्रेनचे प्रचंड नुकसान रशियाने केले आहे.