रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच स्वीडनने मोठा आरोप केला आहे. रशियाची चार लढाऊ विमानं बुधवारी आपल्या हवाई हद्दीत शिरल्याचे स्वीडनचे म्हणणे आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरू असतानाच घडलेल्या या घटनेने युरोपीय देशांत खळबळ उडाली आहे. यापूर्वी, युक्रेननंतर युरोपातील इतर देशांवरही हल्ले होण्याची शक्यता वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केली आहे. अशा परिस्थितीत स्वीडनमध्ये रशियाची लढाऊ विमानं शिरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्वीडनने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, दोन सुखोई-27 आणि दोन सुखोई-24 या लढाऊ विमानांनी अचानकपणे स्वीडनच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता. तत्पूर्वी, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी, नाटोमध्ये गेल्यास स्वीडन आणि फिनलँड सारख्या देशांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला आहे. यानंतर ही घटना घडली आहे.
यासंदर्भात बोलताना स्वीडिश एयरफोर्सचे चीफ कार्ल जोहान अॅड्सट्रॉम म्हणाले, 'सध्याच्या एकूण परिस्थितीमुळे या घटनेसंदर्भात आम्ही अत्यंत चिंतित आहोत. रशियाकडून घडलेली ही घटना, अत्यंत अनप्रोफेशनल आणि बेजबाबदारपणाची आहे.' तसेच, या घटनेनंतर स्वीडिश फोर्सेस तत्काळ सक्रिय झाल्या होत्या. त्यांनी स्वीडिश फायटर जेट्सकडून रशियन लढाऊ विमानांचे फोटोही घेतले आहेत, असेही या निवेदनात म्हणण्यात आले आहे.
आमची तयारी उत्तम होती - स्वीडिश हवाई दलाचे प्रमुख म्हणाले, यावरून स्पष्ट झाले आहे की, आमची तयारी उत्तम होती. आम्ही आमच्या सुरक्षिततेचे आणि अखंडतेचे रक्षण करण्यासाठी तयार आहोत. याशिवाय, 'रशियाकडून स्वीडनच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आहे. हे कदापी स्वीकार केले जाऊ शकत नाही,' असे स्वीडनचे संरक्षणमंत्री पीटर हुल्तक्विस्ट यांनी म्हटले आहे.