रशिया आणि युक्रेनमधील लढाई आता काही थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. एकटा पडल्याने युक्रेन लवकर शरणागती पत्करेल असे रशियाला वाटत होते. परंतू राजधानी कीवपर्यंत वेगाने धडक मारलेल्या रशियाला कीवमध्ये जोरदार प्रत्यूत्तर मिळत आहे. यातच युक्रेनने रशियाला युद्ध थांबवून चर्चेला येण्याचे निमंत्रण दिले होते. रशियाने ते स्वीकार केले होते. मात्र, रशियाने युक्रेनवर गंभीर आरोप केला आहे. रशियाने केलेल्या दाव्यानुसार चर्चेसाठी जो प्रस्ताव दिला होता, तो युक्रेनने स्वीकारलेला नाही. यामुळे आता युक्रेनवर यापेक्षा जोरदार हल्ले चढविले जाणार आहेत. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने याची घोषणा केली आहे. सैन्याला युक्रेनवरील हल्ले आणखी वेगवान आणि आक्रमक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे.
भीषण परिस्थिती, स्फोटांचे आवाज, जीव वाचवण्यासाठी लोकांची पळापळ असं सगळं सुरू असताना एका जोडप्याने लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामागचं नेमकं कारण ऐकून तुम्ही देखील भावूक व्हाल. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार 21 वर्षीय यारयाना अरिएवा (Yaryna Arieva) आणि तिचा पार्टनर 24 वर्षीय प्रियकर स्वियाटोस्लाव फर्सिन (Sviatoslav Fursin ) यांनी कीवमधील सेंट मायकल मॉनेस्ट्रीमध्ये लग्न केलं. खरं तर त्यांना सहा मे रोजी लग्न करायचं होतं. डनिपर नदीवर उभारलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये ते हा सोहळा अत्यंत आनंदात साजरा करणार होते.
"आम्ही जिवंत राहू की नाही काय माहिती? आमचं भविष्य काय असेल?"
देशामध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे सर्व काही अचानक बदललं. "आम्ही जिवंत राहू की नाही काय माहिती? आमचं भविष्य काय असेल? याबाबत कोणालाच माहिती नाही. त्यामुळे आम्ही लगेचच लग्न करण्याचा निर्णय घेतला" अशी प्रतिक्रिया जोडप्याने आपल्या लग्नावर दिली. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे. अरिएवाने परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आम्ही आमच्या देशासाठी सध्या लढत आहोत. कदाचित आमचा मृत्यू देखील होऊ शकतो. त्यामुळेच असं काही होण्याआधी आम्हाला एक व्हायचं आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले
धोक्याची घंटा वाजली आहे. रशियाचे सैन्य युक्रेनच्या जमिनीवर आता आणखी वेगाने व क्रूरतेने आक्रमण करणार आहेत. यामुळे गेल्या तीन दिवसांपेक्षा भयानक ठरण्याची शक्यता आहे. रशियाने रहिवासी इमारतींवर जोरदार मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले होते. यापेक्षा जास्त हल्ले सुरू होण्याची शक्यता आहे. त्यातच अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे खरेदीसाठी पैसे पाठविले आहेत. तसेच फ्रान्सने शस्त्रे पाठविली आहेत. ती वाटेत असल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केला आहे. यामुळे हे युद्ध दोन्ही बाजुंनी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.