Russia Nuclear Weapon: अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:41 PM2022-03-31T15:41:08+5:302022-03-31T15:41:43+5:30
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती.
स्टॉकहोम:
युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती. रशियन विमानांनी स्वीडनच्या हवाई क्षेत्रात जाणूनबुजून प्रवेश केल्याचं सांगण्यात येत आहे. 'नाटो' देशांच्या अगदी जवळ असलेल्या कॅलिनिनग्राड हवाई तळावरून २ मार्च रोजी रशियन लढाऊ विमानांनी उड्डाण केले. रशियन विमानं स्वीडनच्या गॉटलँड बेटांच्या दिशेनं जात होती.
TV4 Nyheter च्या रिपोर्टनुसार, 'नाटो' सदस्य आणि स्वीडन तसंच फिनलँडसारखे तटस्थ देश किती वेळात प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्यासाठी जाणूनबुजून रशियन फायटर जेट्सनंनं स्वीडच्या हद्दीत प्रवेश केला होता. पण रशियन विमानंनी घुसखोरी करताच स्वीडिश हवाई दल पूर्णपणे सतर्क होतं आणि त्यांनी त्वरित प्रत्युत्तर दिलं. युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर स्वीडिश हवाई दल अलर्ट मोडवर आहे. दरम्यान, घुसखोरीच्या वेळी रशियन विमानं अणुबॉम्बनं सज्ज होती, अशी माहिती आता समोर आली आहे.
'रशियाकडून बेजबाबदार, अव्यावसायिक वर्तन'
दोन्ही सुखोई विमानांमध्ये घुसखोरीच्या वेळी अण्वस्त्रं होती, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वीडनसाठी हा एक इशाराच आहे. आमच्याकडे अण्वस्त्र आहेत आणि त्यांचा वापर करण्यासाठी आम्ही कुणालाही घाबरत नाही असं रशियानं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, असं लष्करी विश्लेषक स्टीफन रिंग म्हणालेय. "आम्हाला विश्वास आहे की रशियानं हे हेतुपुरस्सर केलं आहे, जे खूप गंभीर आहे कारण तुम्ही सध्या युद्धाला समोरं जाणारा देश आहात. अशा काळात असं काही करणं योग्य नाही", असं स्वीडिश हवाई दलाचे प्रमुख कार्ल जोहान इडस्ट्रोम म्हणाले.
रशियन लढाऊ विमाने स्वीडिश हवाई क्षेत्रात काही काळासाठीच होती, जी कदाचित एक मिनिटाच्या जवळपास होती. त्यानंतर ती त्यांच्या रशियन प्रदेशात परतली, असं कार्ल जोहान म्हणाले. रशियाच्या बाजूनं हे बेजबाबदार आणि अव्यावसायिक वर्तन आहे, असंही ते पुढे म्हणाले आहेत. स्वीडन हा नाटोचा सदस्य देश नाही, परंतु स्वीडनच्या सैन्यानं अनेक वेळा नाटो देशांच्या सैन्यासोबत लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. या खुलाशानंतर युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाची अण्वस्त्र कारवाईची भीती पुन्हा वाढली आहे.