मॉस्को: रशियाने (Russian Sea) जपानजवळच्या समुद्रात गस्त घालत असलेल्या अमेरिकी नौदलाच्या एका युद्धनौकेला (American destroyer) पिटाळून लावले आहे. रशियन नौदलाने या घटनेचा व्हिडीओ जारी केला असून तशी घोषणाही केली आहे. अमेरिकेची युद्धनौका रशियन समुद्रात घुसखोरी करत होती. तेव्हा रशियन युद्धनौकेने (warship) तिला घेरले आणि रोखल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिका आणि रशियामध्ये काळ्या समुद्रात तणाव पहायला मिळते होता. तो आता प्रशांत महासागरात पहायला मिळत आहे. या दरम्यान रशिया आणि चीन नौदलांमध्ये युद्ध सरावही सुरु आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, रशियन हद्दीत घुसलेल्या या युद्धनौकेला मागे जाण्यासाठी अनेकदा सूचना देण्यात आली. परंतू तरीही अमेरिकेने आगळीक केल्याने रशियन युद्धनौका त्या युध्दनौकेजवळ न्यावी लागली. हे अंतर एवढे जवळ होते की दोघांमध्ये 60 मीटरचे अंतर राहिले.
यामुळे अमेरिकी युद्धनौकेसमोर मागे जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याने रस्ता बदलत माघारी जाणे पसंत केले. ही अमेरिकेची अर्ले बर्क-क्लास गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर यूएसएस चाफी होती आणि रशियाची उदलॉय क्लासची अंटी सबमरीन शिप एडमिरल ट्रिब्यूट्स होती.
रशियाने सांगितले की, अमेरिकेच्या युद्धनौकेवरून हेलिकॉप्टर आकाशात झेपावणार होते. युद्धनौकेचा रस्ता बदलण्याऐवजी हेलिकॉप्टर उड्डाणाची तयारी करत होते. याचा अर्थ युद्धनौकेला आपला रस्ता आणि वेगात बदल करणे आता शक्य नाहीय असा होतो. मात्र, रशियन युद्धनौकेने त्यांचा रस्ता रोखला आणि आपली युद्धनौका त्यांच्या अत्यंत जवळ नेली. रशियाने या घटनेनंतर अमेरिकेच्या रशियातील दुतावासाच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेत चाफीवरील अधिकाऱ्यांनी जे काही केले ते निषेधार्ह असल्याचे सांगितले.