रशिया आणि युक्रेनमध्ये भयंकर युद्ध सुरू आहे. रशियाविरुद्धच्या या युद्धातअमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसह सर्व नाटो देश युक्रेनला पाठिंबा देत आहेत आणि शस्त्र पुरवत आहेत. या सगळ्यात रशियाने आपल्या सैनिकांना मोठी ऑफर दिली आहे. युक्रेनच्या आकाशात उडणाऱ्या अमेरिकन एफ-१६ आणि फाल्कन विमानांना जर त्यांनी खाली पाडलं तर त्यांना बक्षीस मिळेल, असे रशियन कंपन्यांनी सैनिकांना सांगितलं आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सोशल मीडिया पोस्टमध्ये या ऑफरची माहिती दिली. यामध्ये, रशियन तेल कंपनी FORES च्या संचालकांनी म्हटलं आहे की, F-१५, F-१६ सारखे विमान पाडण्यासाठी, रशियन वैमानिकांना १५ मिलियन रूबल्स म्हणजेच १.४ कोटी रुपये मिळतील. नाटोचा टँक उडवणाऱ्याला पाच लाख रुबल्सचे बक्षीसही देण्यात येणार असल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.
ही घोषणा एका सन्मान समारंभात करण्यात आली, जिथे युक्रेनमधील अवदीवका येथे सैनिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. फॉरेसच्या सीईओने जूनमध्ये टँक उडवणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं होतं. आता फॉरेस कंपनीने लढाऊ विमान पाडणाऱ्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. हे अशा वेळी केले गेले जेव्हा अलीकडेच डेन्मार्क आणि नेदरलँडच्या सरकारांनी दावा केला होता की F-१६ लढाऊ विमाने युक्रेनला जात आहेत.
डेन्मार्क आणि नेदरलँडने रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनची ताकद वाढवण्यासाठी ८५ जेट विमाने देण्याची घोषणा केली आहे. यानंतर आणखी विमाने येणार असल्याचंही युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी सूचित केलं होतं. नाटो देशांकडून युक्रेनला F-१६ विमानांची डिलिव्हरी नाटोचे सरचिटणीस जेन्स स्टोलटेनबर्ग यांनी जाहीर केलेल्या पॅकेजचा भाग आहे.