ऑनलाइन लोकमत
मॉस्को, दि. 7 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीदरम्यान रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्यासाठी खूनी हा शब्द वापरल्याबद्दल रशिया चांगलाच संतापला आहे. काही दिवसांपूर्वी हा इंटरव्यू फॉक्स न्यूजवर प्रसारित करण्यात आला होता. फॉक्स न्यूजने याबाबत माफी मागावी अशी मागणी रशियाकडून करण्यात आली आहे.
फॉक्स न्यूजचे एंकर बिल ओ राइली यांनी ट्रम्प यांच्यासोबत इंटरव्यूमध्ये पुतीन यांचा उल्लेख खूनी 'अ किलर' असा केला होता. पुतीन यांचा उल्लेख खूनी असा करण्यामागे काय संदर्भ होता याबबात राइली यांनी इंटरव्यूमध्ये काहीही स्पष्टीकरण दिलं नव्हतं.
ट्रम्प हे पुतीन यांचा सन्मान करतात का? असा प्रश्न राइली यांच्याकडून विचारण्यात आला त्यावर ट्रम्प यांनी हो उत्तर दिलं असता पुतीन हे खूनी आहेत, तरी ट्रम्प त्यांचा इतका सन्मान का करतात असा प्रश्न राइली यांनी विचारला. त्यावर ट्रम्प यांनी आपल्याकडेही (अमेरिका) बरेच खूनी आहेत, तुम्हाला काय वाटतं आपला देश खूप निर्दोष आहे का असं उत्तर ट्रम्प यांनी दिलं.
फॉक्स न्यूजने वापरलेलेल शब्द अवमानकारक असून असे शब्द स्वीकारले जाणार नाहीत असं रशियाने म्हटलं आहे. तसंच हे प्रतिष्ठीत चॅनल या प्रकरणावर माफी मागेल अशी अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे.