रशियाचा नागरी वस्त्यांवर हल्ला; युक्रेनमध्ये १७ ठार; मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 05:41 AM2022-10-10T05:41:07+5:302022-10-10T05:41:17+5:30
झापोरिझिया येथील अणुप्रकल्पावर रशियाने याआधीच कब्जा मिळविला आहे. या अणु प्रकल्पापासून जरा दूर अंतरावर असलेल्या भागात रशियाने गेल्या दोन दिवसांत क्षेपणास्त्रांचा मारा केला होता.
कीव्ह : युक्रेनमधील झापोरिझियातील नागरी वस्त्यांवर रशियाच्या लष्कराने रविवारी पहाटे साडेचार वाजता क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यामध्ये १७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ४९ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा बालकांचा समावेश आहे.
या हल्ल्यामध्ये पाच इमारतींचे मोठे नुकसान झाले तसेच २४ कार भस्मसात झाल्या. सदर घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरी वस्त्यांवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा युक्रेनने निषेध केला आहे.
झापोरिझिया येथील अणुप्रकल्पावर रशियाने याआधीच कब्जा मिळविला आहे. या अणु प्रकल्पापासून जरा दूर अंतरावर असलेल्या भागात रशियाने गेल्या दोन दिवसांत क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. त्यामुळे झालेल्या हानीने वीजनिर्मिती केंद्राकडून या अणुप्रकल्पाला होणारा वीजपुरवठा बंद झाला आहे. डिझेलवर चालणाऱ्या जनरेटरद्वारे वीजनिर्मिती करून आता हा अणुप्रकल्प चालविण्याची वेळ आली आहे. तशी यंत्रणा या झापोरिझियाच्या अणुप्रकल्पात आहे.
रशिया व क्रिमिया यांना जोडणाऱ्या १९ किमी लांबीच्या पुलावर शनिवारी झालेल्या ट्रक बॉम्बस्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रशियाने झापोरिझियामध्ये पुन्हा हल्ले केेले. (वृत्तसंस्था)
झापोरिझियामध्ये रशियाला होतोय अद्यापही विरोध
झापोरिझियामध्ये रशियाला अद्यापही तेथील नागरिक व युक्रेनच्या सैन्याशी संघर्ष करावा लागत आहे. तो दडपून टाकण्यासाठी रशियाने झापोरिझिया येथे हल्ले सुरू ठेवले आहेत. युक्रेनचे लुहान्स्क, डोनेत्स्क, खेरसन आणि झापोरिझिया हे प्रदेश रशियात विलीन करण्यात आल्याचे पुतीन सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. या चार प्रदेशांमध्ये घेतलेल्या सार्वमतात तेथील नागरिकांनी रशियात विलीन होण्याच्या बाजूने कौल दिल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला होता. या प्रदेपुतीन यांनी विलिनीकरणाचा करारही घडवून आणला. मात्र हे विलिनीकरण अवैध असल्याची टीका युक्रेन, अमेरिकेसह आणखी काही देशांनी केली आहे.