Russia Ukraine War: रशियाचे मोठे पाऊल! नासा आणि युसाशी संबंध तोडले; अंतराळ स्थानकातून बाहेर पडला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 03:11 PM2022-04-02T15:11:19+5:302022-04-02T15:15:35+5:30
रशिया आता चीनसोबत काम करण्याची शक्यता आहे. चीन आपले स्वत:चे अंतराळ स्टेशन उभारण्याचे काम करत आहे. असे झाले तर अंतराळातही शीतयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.
रशियाने युक्रेनवर हल्ला केल्याने अमेरिका आणि युरोपीय देशांनी कठोर निर्बंध लादले आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक भारतावर पाडणार का असा सवाल गेल्या महिन्यात रशियाने विचारला होता. रशियावर व्यापारी, तंत्रज्ञान आदी गोष्टींवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरून रशियाने आता मोठा निर्णय घेतला आहे.
अंतराळात जे अंतराळवीर जातात त्यांना प्रशिक्षण देणे, तंत्रज्ञान निर्माण करणे आदी कामे रशिया आणि अमेरिका एकत्र मिळून करते. यासाठी दोन्ही देशांत करार झालेला आहे. आता अमेरिकेने निर्बंध लादलेत तर मग आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनची सुरक्षा कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
रशियाच्या स्पेस एजन्सी रॉसकॉसमॉस (Roscosmos) चे प्रमुख दिमित्री रोगोजिन यांनी आता रशिया यापुढे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर काम करणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यांनी हे सहकार्य समाप्त केल्याचे म्हटले आहे. यापुढे रशिया अमेरिकेची अंतराळ संस्था नासा आणि युरोपची अंतराळ संस्थेसोबत काम करणार नसल्याचे म्हटले आहे.
धक्कादायक म्हणजे रशिया आता चीनसोबत काम करण्याची शक्यता आहे. चीन आपले स्वत:चे अंतराळ स्टेशन उभारण्याचे काम करत आहे. असे झाले तर अंतराळातही शीतयुद्ध भडकण्याची शक्यता आहे.