रशियाने तयार केलेली कोरोनावरील लस स्पूतनिक व्ही यासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या सरसावल्या आहेत. भारतीय कंपन्यांनी रशियन संचालक गुंतवणूक निधी (आरडीआयएफ) यांच्यकडे लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल चाचण्यांविषयी माहिती देण्यास सांगितले आहे.
आरडीआयएफ रशियाची भांडवल पुरवठा करणारी कंपनी आहे. याच कंपनीने कोरोना लस स्पूतनिक व्हीचे संशोधन आणि चाचणीसाठी वित्तसहाय्य केले आहे. आरडीआयएफला ही लस वितरण व निर्यात करण्याचा अधिकार आहे. ही लस जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस आहे. जर आरडीआयएफसोबत भारतीय कंपन्यांची चर्चा सुरुच राहिली तर लस भारतात तयार होऊ शकते. ही लस निर्यात आणि देशात वापरली जाऊ शकते. मॉस्को येथील भारतीय दूतावासाच्या सूत्रांनी रशियन वृत्तसंस्था स्पूतनिकला ही माहिती दिली आहे.
रशियन दूतावासातील सूत्रांनी सांगितले की, "भारतीय कंपन्या लस संदर्भात आरडीआयएफशी संपर्क साधत आहेत आणि या कंपन्यांनी फेज -१ आणि फेज -२ चाचणीसाठी तांत्रिक माहिती मागविली आहे. या कालावधीत सरकारकडून आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर तिसर्या देशाला लसीच्या निर्यातीवर चर्चा झाली. याशिवाय, देशातील वापरासाठी लस निर्मितीवरही चर्चा झाली."
रशिया कोरोनाविरूद्ध लस रजिस्टर करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. ही लस रशियाच्या मायक्रो बायोलॉजी रिसर्च सेंटर गमलयाने विकसित केली आहे. ही लस बुधवारी क्लिनिकल चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात गेली आहे. रशियामध्ये भारताचे राजदूत वेंकटेश वर्मा यांनी वृत्तसंस्था स्पूतनिकला सांगितले की, लस निर्मितीसंदर्भात आरडीआयएफ प्रमुख किरिल दिमित्रीव्ह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली आहे. तसेच, यासंदर्भात सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.