रशियाच्या पहिल्या युद्ध कैद्याला आजन्म कारावासाची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 07:21 AM2022-05-24T07:21:53+5:302022-05-24T07:22:31+5:30
२१ वर्षाचा सैनिक; निरपराध नागरिकाला ठार मारल्याचा गुन्हा
कीव्ह : युक्रेनमध्ये पहिल्या युद्ध कैद्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका निरपराध नागरिकाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या आरोपावरून वदिम शिशिमारिन या रशियन सैनिकाला युक्रेन लष्कराने अटक केली होती. युद्धामध्ये केलेल्या गुन्ह्यांबद्दल त्याच्यावर खटला दाखल केला होता.
युक्रेनचा एक नागरिक मोबाईलवर बोलत होता. तो रशियाच्या सैन्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱ्यांना देण्याची शक्यता वाटल्यामुळे त्याला गोळ्या घालून ठार मारण्याचा हुकूम वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला होता. त्याचे आपण पालन केल्याचे शिशीमारिन याने न्यायालयाला सांगितले. रशियाने मारियुपोलच्या स्टील प्रकल्पातून युक्रेनच्या अडीच हजार सैनिकांनी अटक केली आहे. या युद्धकैद्यांना युक्रेनच्या फुटिरतावादी प्रांतांमधील कारागृहांमध्ये डांबण्यात आले आहे. त्या सैनिकांवर युद्ध गुन्हेगारीचे खटले चालविण्याचा रशियाचा विचार आहे. त्या सैनिकांची मुक्तता करावी, अशी मागणी युक्रेनने केली आहे. या घ़डामोडी सुरू असतानाच युक्रेनने रशियाच्या एका सैनिकाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावल्याने दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)
रशियाच्या सर्व बँकांवर बंदी घाला : जेलेन्स्की
आंतरराष्ट्रीय समुदायाने रशियाच्या सर्व बँका, त्या देशाशी तेलासहित इतर वस्तूंचा होणारा व्यापार यावर बंदी घालावी, असे आवाहन युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी केले आहे. जेलेन्स्की म्हणाले की, युद्धसमाप्तीनंतर देशाची घडी पुन्हा नीट बसवताना आम्हाला अनेकांचे सहकार्य लागणार आहे.
स्टारबक्सनेही रशिया सोडले
मॉस्को : कॉफी विकून जगभर अवाढव्य साम्राज्य निर्माण केलेल्या स्टारबक्सने रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेमोमध्ये, कंपनीने रशियातील १३० स्टोअर बंद करत असल्याचे म्हटले आहे. स्टोअर बंद केले असले तरीही स्टारबक्स आपल्या सुमारे २ हजार रशियन कर्मचाऱ्यांना सहा महिन्यांसाठी पगार देत राहणार आहे. गेल्या आठवड्यात कडोनल्ड्सने रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर स्टारबक्सकडून बाहेर पडण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. कोका कोला, पेप्सिकोसह अनेक कंपन्यांनी रशियातील उत्पादन आणि विक्री पूर्णपणे थांबवली आहे.