रशियाची सर्वात शक्तीशाली अण्वस्त्रवाहू पाणबुडी मध्येच गायब झाली; आर्टिकहून निघालेली...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 07:30 PM2022-10-03T19:30:36+5:302022-10-03T19:31:14+5:30
पोसायडन हा रशियाचा असा ड्रोन आहे जो पाण्याखाली कित्येक किमीचे अंतर पार करू शकतो. यानंतर त्याच्या स्फोटाने एवढी शक्ती निर्माण होते की १६०० फुटांपर्यंत त्सुनामी तयार होते.
युक्रेनमधील युद्ध आता अंतिम टप्प्यात आले आहे. रशियाने युक्रेनचा काही भाग बळकावला असून त्याला आपल्या देशात सामिल करून घेतले आहे. रशियाला लाखो क्षेपणास्त्रे डागूनही काही हाती लागलेले नाही. युक्रेनी सैन्य आता डोनबासदेखील ताब्यात घेण्याच्या अवस्थेत आहे. अशावेळी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ल्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असताना समुद्रात एक खळबळजनक घटना घडली आहे.
रशियाची आर्कटिकहून निघालेली सर्वात शक्तीशाली अण्वस्त्रवाहू पाणबुडी मध्येच गायब झाली आहे. ही पाणबुडी कुठे आहे हे रशियाशिवाय कोणालाच माहिती नाहीय. पुतीन यांच्या आदेशावरून रशियाने बेलगोरोड ही पाणबुडी तैनात केली होती. या पाणबुडीद्वारे जगातील सर्वात खतरनाक पाण्याखालील पोसायडन ड्रोनद्वारे अणुबॉम्बची चाचणी घेतली जाण्याची शक्यता, नाटोने व्यक्त केली आहे.
पोसायडन हा रशियाचा असा ड्रोन आहे जो पाण्याखाली कित्येक किमीचे अंतर पार करू शकतो. यानंतर त्याच्या स्फोटाने एवढी शक्ती निर्माण होते की १६०० फुटांपर्यंत त्सुनामी तयार होते. यामुळे अख्खे शहरच्या शहर या त्सुनामीत बरबाद होऊ शकते. अण्वस्त्र असल्याने अणू किरणेदेखील बाहेर पडतात, यामुळे आणखी विध्व्ंस होतो. जर ही चाचणी झाली तर ती पश्चिमेकडील देशांना ही एक गर्भित धमकी असणार आहे.
पुतिन यांनी गेल्या आठवड्यात नॉर्ड स्ट्रीम पाईप्सवर हल्ल्यांचे आदेश दिले होते. ही पाणबुडी अनेक लहान पाणबुड्या देखील वाहून नेऊ शकते ज्या समुद्राच्या आतील पायाभूत सुविधा नष्ट करण्यास सक्षम आहेत. नॉर्डवरील हल्ल्यात या पाणबुडीचा हात होता याची अद्याप पुष्टी झालेली नाही. या 600 फूट लांबीच्या पाणबुडीचा जगातील सर्वात मोठ्या पाणबुड्यांमध्ये समावेश होतो. बेल्गोरोडला आर्टिक समुद्रातील मूळ तळापासून बाल्टिक समुद्रापर्यंत जाण्यासाठी पुरेसा वेळ होता की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दोन्ही ठिकाणचे अंतर ३००० मैल एवढे आहे. यामुळे ही पाणबुडी कोणत्या समुद्रात जाऊन लपेल हे नाटोलाही समजलेले नाही.