कीव्ह/माॅस्काे : रशिया युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला करणार असल्याचा दावा युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वाेलाेदिमीर जेलेन्सकी यांनी अनेकदा केला आहे. मात्र, ताे खरा ठरणार की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियाने टीयू-१६० बाॅम्बर जेट्स तैनात केली आहेत. अण्वस्त्र हल्ल्यासाठी या विमानांचा वापर हाेताे. रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावराेव्ह यांनीही रशियाची माेहीम नव्या टप्प्यात प्रवेश करत असल्याचे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर आल्याची भीती निर्माण झाली आहे. दुसरीकडे, रशियाने खारकीव्ह आणि डाेनबासमध्ये माेठ्या प्रमाणावर हल्ले केले आहेत. त्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.जेलेन्स्की यांनी जगाला रशियाच्या अण्वस्त्र हल्ल्यासाठी तयार राहण्याचा इशारा दिला हाेता. तसेच लाेकांनी किरणाेत्सर्गराेधक औषधांचा साठा करायला सुरुवात करावी, असेही सांगितले हाेते. रशियाची अत्याधुनिक टीयू-१६० लढाऊ विमाने युक्रेनच्या सीमेवर दिसली आहेत. अण्वस्त्र हल्ल्यासाठी ही विमाने सज्ज आहेत. त्यामुळे रशिया-युक्रेन युद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपल्याचे स्पष्ट हाेत आहे. दुसरीकडे, रशियाने पूर्व युक्रेनमधील औद्याेगिक केंद्रावर नियंत्रण मिळविण्यासाठी माेठा हल्ला केला आहे. पूर्वेकडील डाेनबास भागावर रशियाला नियंत्रण मिळवायचे आहे. त्यासाठी रशियाने खारकीव्हला पुन्हा लक्ष्य केले असून या भागातून लुहान्स्क आणि डाेनेत्स्कच्या दिशेने रशियन फाैजा पुढे सरसावत आहेत.
युक्रेनचे ‘क्रीडांगण’ रशियाच्या ताब्यात -खारकीव्हवर केलेल्या हल्ल्यात ५ नागरिकांचा मृत्यू झाला असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय रशियन सैन्य क्रेमिन्नामध्ये शिरले आहे. हे एक माेठे क्रीडा केंद्र असून युक्रेनच्या ऑलिम्पिक संघासाठी खेळाडूंना येथे प्रशिक्षण देण्यात येते.जपाेरिजियातील १५५ नागरिकांचे रशियाने अपहरण केल्याचा दावा स्थानिक सरकारने केला आहे. त्यापैकी ८६ जणांना साेडण्यात आले असून अजूनही ६९ नागरिक रशियाच्या कैदेत असल्याचे सरकारने म्हटले आहे.
- युराेपियन संघाच्या सदस्यत्वासाठी जेलेन्स्कींचा अर्ज वाेलाेदिमीर जेलेन्सकी यांनी युराेपियन संघाच्या सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे.- जेलेन्सकी यांचे ‘नाटाे’मध्ये सहभागी हाेण्याचे प्रयत्न हाेते. त्यातूनच युद्धाची ठिणगी पडली. - याशिवाय त्यांनी युराेपियन संघाच्या सदस्यत्वासाठी जाेरदार प्रयत्न केले.- युराेपियन संघाच्या नेत्यांनी युक्रेनला भेटही दिली हाेती. त्यावेळी युक्रेनचे संघात स्वागत असल्याचे वक्तव्यही करण्यात आले हाेते.