नवी दिल्ली : भारत व चीनमधील वादांमध्ये रशिया हस्तक्षेप करणार नाही. या वादांवर शांततामय मार्गाने तोडगा काढण्यात यावा, अशी आमची भूमिका आहे असे रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलिपोव्ह यांनी सांगितले. ते म्हणाले की, काही देश चीन व भारत यांच्यामधील तणाव व संशयाचे वातावरण आणखी वाढावे यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र रशिया अशी भूमिका कधीही घेणार नाही. भारत व चीनने आपापसातील वाद चर्चेच्या माध्यमातून सोडवावे अशी रशियाची भूमिका आहे.
पूर्व लडाखमधील सीमातंट्यामुळे भारत व चीनमधील तणाव वाढला आहे. पॅनगाँग तलाव परिसरात यंदाच्या वर्षी ५ मे रोजी झालेल्या सशस्त्र संघर्षानंतर हा वाद आणखी चिघळला. विस्तारवादी भूमिका असलेला चीन हा भारताच्या सातत्याने कुरापती काढत आहे. पूर्व लडाखमधील गोग्रा-हॉटस्प्रिंग्ज भागातील पेट्रोलिंग पॉइंट १५ येथे दोन्ही देशांचे सैन्य माघारी परतले आहे. सैन्य माघारी घेण्याची ही प्रक्रिया पाच दिवस सुरू होती. भारताला एस-४०० क्षेपणास्त्रे आधी ठरलेल्या वेळीच मिळणार आहेत. अलिपोव्ह यांनी म्हटले आहे.