RussiavsUkraine: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरुद्ध सुरू असलेल्या युद्धादरम्यान तीन लाख राखीव सैन्य जमा करण्याची घोषणा केली आहे. अशा स्थितीत एकीकडे रशिया सरकारचा दावा आहे की, जवळपास 10 हजार लोक स्वत:च्या इच्छेने सैन्यात भरती होण्यासाठी पुढे आले आहेत. त्याचवेळी, अनेक रशियन नागरिकांनी युद्धात जावे लागू नये, या भीतीने देश सोडण्यास सुरुवात केल्याचेही वृत्त आहे.
व्लादिमीर पुतिन यांनी सैन्य तैनात करण्याच्या आदेशानंतर सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये शेकडो लोक रशियातून पळून जाताना दिसत आहेत. सैन्यात भरती होण्यासाठी बोलावले जाईल, अशी त्यांना भीती आहे. पुतीन यांच्या घोषणेनंतर लोकांना समन्स पाठवून सैन्यात भरती होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
पुतिन यांनी 300000 सैनिकांची जमवाजमव करण्याची घोषणा अशा वेळी केली, जेव्हा रशिया युक्रेनच्या चार भागांना जोडण्याच्या तयारीत आहे. यासाठी रशिया शुक्रवारपासून या भागात सार्वमत घेण्यास सुरुवात करणार आहे. या भागात राहणारे लोक 23 ते 27 सप्टेंबर दरम्यान मतदान करू शकतील.
रशियाच्या लष्कराने सांगितल्यानुसार, पुतीन यांच्या घोषणेनंतर हजारो रशियन सैन्यात सामील होण्यासाठी पुढे आले आहेत. यातच, युद्धात सामील होण्याची इच्छा नसलेले अनेकजण देश सोडून पळून जात आहेत. मात्र, नागरिकांनी देश सोडल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचे रशियाचे म्हणणे आहे. लष्करी सेवा केलेल्या आणि विशेष कौशल्य आणि युद्धाचा अनुभव असलेल्या लोकांनाच बोलावण्यात येईल, असे रशिया सरकारकडून सांगण्यात येत आहे.