Russis Ukraine Crisis : किव्ह : युक्रेनने शरणागती पत्करल्यास त्या देशाशी चर्चा करण्यासाठी आम्ही शिष्टमंडळ पाठविण्यास तयार आहोत, असे रशियाचे परराष्ट्रमंत्री सेर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. या चर्चेसाठी बेलारूस देशाच्या युक्रेनमध्ये नवनाझी उदयाला येऊ नयेत, असे रशियाला वाटते, असेही ते म्हणाले. रशियाच्या लष्कराने युक्रेनवर जवळपास ताबा मिळविला आहे. गेल्या दोन दिवसांच्या युद्धात १३७ जण ठार झाल्याचे युक्रेनने म्हटले आहे.रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी किव्ह भोवतालचा विळखा आणखी घट्ट केला आहे. हे शहर हातातून गेल्यास युक्रेनचा पूर्ण पराभव होईल. त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की हे एका बंकरमध्ये लपून बसले आहेत. युक्रेनमधील नागरिक त्यांच्याकडे जी शस्त्रास्त्रे आहेत, त्याच्या आधारे रशियन सैनिकांना जागोजागी कडवा प्रतिकार करत होते. त्यामुळे या युद्धाला आणखी धार चढली. युक्रेनवर रशियाने केलेल्या आक्रमणात आतापर्यंत १३७ जण ठार झाल्याचे त्या देशाचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी म्हटले आहे. लष्करी कारवाई सुरू झाल्यापासून अवघ्या ३० तासांच्या आत रशियाच्या फौजा युक्रेनची राजधानी किव्हच्या जवळ पोहोचल्या होत्या. आम्ही युक्रेनवर कब्जा करणार नसून तिथे फक्त सत्ता परिवर्तन घडवू, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी याआधीच जाहीर केले आहे. युक्रेनने शरणागती पत्करल्यास त्याच्याशी चर्चा करण्याकरिता बेलारूस देशाच्या मिन्स्क शहरात शिष्टमंडळ पाठविण्यास रशियाने तयारी दाखविली आहे.
आतापर्यंत २०० क्षेपणास्त्रांचा मारायुक्रेनवर रशियाने गेल्या दोन दिवसात २००हून अधिक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. त्या देशातील ११ विमान धावपट्ट्यांसह ७०हून अधिक लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा दावा रशियाने केला. या हल्ल्यांपासून जीव वाचविण्यासाठी युक्रेनमधील नागरिकांनी मेट्रो रेल्वे स्थानकांचा आश्रय घेतला आहे.
युक्रेनच्या १३ सैनिकांचा मृत्यूयुक्रेनमधील स्नेक बेटावर तैनात असलेल्या १३ सैनिकांना रशियन युद्धनौकेवरील सैनिकांनी शरण येण्यास सांगितले होते; परंतु युक्रेनचे हे शूर सैनिक शत्रूपुढे न झुकता लढत राहिले. युक्रेनच्या या बहादूर सैनिकांनी रशियन लष्कराला दिलेल्या आव्हानाची ध्वनिफित समाजमाध्यमांवर झळकली आहे.
युद्ध थांबवा : नाटो नाटोकडून रशियाला युक्रेनसाेबत सुरू असलेले युद्ध तातडीने थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. युक्रेनला मदत करण्याची भूमिका नाटो देशांनी घेतली आहे. युक्रेनला मदतीसाठी नाटोचे सैन्य तयार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
युक्रेन लष्कराने सत्ता हाती घ्यावी : पुतिनयुक्रेनच्या लष्कराने त्या देशाची सत्ता हातात घ्यावी. युक्रेनमधील नवनाझी व कट्टरपंथीयांना मोकळे रान देऊ नका. तुमची मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांची मानवी ढाल तयार करून हे नवनाझी आपले हेतू साध्य करू पाहात आहेत. त्यांना युक्रेन लष्कराने वेळीच रोखले पाहिजे. युक्रेनमध्ये रशियाच्या लष्कराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. व्लादिमीर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
युक्रेन प्रश्न चर्चेद्वारे सोडवावा रशिया व युक्रेनने मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवावेत. त्यासाठी दोन्ही देशांना चीनचा पाठिंबा आहे. युक्रेन युद्धाबाबत चीनने सावध भूमिका घेतली आहे. त्या देशाने रशियाला पाठिंबा दिलेला नाही किंवा निषेधही केलेला नाही. रशिया व चीनचे घनिष्ठ व्यापारी संबंध आहेत. त्याला धक्का लागू न देण्याची काळजी चीनने घेतली आहे. क्षी जिनपिंग, राष्ट्राध्यक्ष, चीन
तुर्कीच्या मालवाहू जहाजावर हल्ला
- युक्रेनच्या ओडेसा बंदरातून नाटोचा सदस्य असलेल्या रोमानिया या देशाकडे रवाना झालेल्या तुर्कस्थानच्या मालवाहू जहाजावर भूमध्य सागरात बॉम्बहल्ला झाला.
- हा हल्ला नेमका कोणी केला, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. युक्रेनवरील आक्रमणानंतर दुसऱ्याच दिवशी घडलेल्या या घटनेने नाटोचे सदस्य देश अस्वस्थ झाले आहेत.
- नाटो देशांवर रशियाने हल्ला केल्यास आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी याआधी दिला होता. या हल्ल्याबाबत अमेरिकेची काय भूमिका आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भारताने पाठिंबा द्यावासंयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने आम्हाला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा रशियाने व्यक्त केली आहे. भारताबरोबर आमचे अतिशय उत्तम संबंध आहेत. त्यामुळे आम्ही घेतलेली भूमिका भारताने नीट समजून घेतली असावी असेही रशियाने म्हटले आहे.
नाटो निर्णायक पाऊल उचलण्यात अपयशी युक्रेनवर रशियाने आक्रमण केल्यानंतर नाटो संघटना व युरोपीय समुदायाने निर्णायक पाऊल उचलले नाही. या संघटना युक्रेनला फक्त सल्ले देत राहिल्या. रशिया व युक्रेनने परस्परांतील मतभेदांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढावा. पाश्चिमात्य देशांनी ठोस निर्णय घेऊन पावले उचलली असती तर युक्रेनमध्ये वेगळे चित्र दिसले असते. युक्रेनवर झालेला हल्ला अयोग्य आहे. रिसिप तय्यीप एद्रोगन, राष्ट्राध्यक्ष, तुर्कस्थान
ते मला व कुटुंबाला ठार मारतीलरशियासाेबतच्या युद्धात आम्ही एकटे पडलाे आहेत. मी त्यांच्या निशाण्यावर पहिल्या स्थानावर असून ते मला ठार मारतील. त्यानंतर माझे कुटुंब त्यांच्या निशाण्यावर आहे.वोलोदिमीर जेलेन्स्की, राष्ट्राध्यक्ष, युक्रेन
...तर रशियाशी संबंध पूर्णपणे बिघडतील युक्रेनविरोधातील युद्ध रशियाने न थांबविल्यास अमेरिका व रशियातील संबंध पूर्णपणे बिघडतील. रशियाने आपला हट्ट सोडला नाही तर त्या देशावर अमेरिका व मित्रराष्ट्रे आणखी कडक आर्थिक निर्बंध लादतील, असा इशारा बायडेन यांनी दिला होता. आम्ही पुतीन यांचे मन वळविण्याचे केलेले सारे प्रयत्न फोल ठरले आहेत. त्यामुळे आता अतिशय कठोर धोरणाचा अवलंब करण्याचा विचार आहे. जो बायडेन, राष्ट्राध्यक्ष अमेरिका