उत्तर कोरियाच्या (North Korea) सर्वात मोठ्या हॉटेल रयुगयोंगमध्ये (Ryugyong Hotel) तब्बल ३ हजार खोल्या आहेत. पण इथं कुणीच राहत नाही. यामागे एक रहस्य दडल्याचं बोललं जातं. बऱ्याच काळापासून या हॉटेलमध्ये कुणीच राहत नसल्यानं हे हॉटेल शापित असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. रयुगयोंग हे हॉटेल उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल यांनी उभारलं होतं. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ हे हॉटेल उभारल्याचं सांगितलं जातं. त्यांना उंच इमारतींची खूप आवड होती. (ryugyong hotel the story of north koreas hotel of doom)
रयुगयोंग हॉटेलच्या बांधकामाची सुरुवात १९८७ साली झाली होती. त्यावेळी किम जोंग इल यांनी हे हॉटेल जगातील सर्वात मोठं आणि शानदार हॉटेल असेल असा दावा केला होता. तब्बल १००० फूट उंच आणि १०५ मजले असलेल्या या भव्य इमारतीत ५ फिरते रेस्टॉरंट्स आहेत. हॉटेलच्या निर्मितीपासूनच अनेक अडचणी आल्या होत्या. तांत्रिक अडचणींपासून ते हॉटेलच्या इमारतीच्या उभारणीसाठी लागणाऱ्या सामग्रीपर्यंत अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
९० च्या दशकात काम थांबलं९० च्या दशकात जेव्हा आर्थिक मंदी आली त्यावेळी या इमारतीचं बांधकाम थांबलं होतं. इमारत उभी राहिली होती पण इमारतीच्या आत काहीच काम झालं नव्हतं. तब्बल १६ वर्ष ही इमारत त्याच अवस्थेत पडून होती. त्यानंतर २००८ साली पुन्हा एकदा इमारतीचं काम सुरू झालं. ज्यात तब्बल १८० मिलियन डॉलरचा खर्च आला. काही वर्षांत हे हॉटेल तयार देखील झालं. लोकांसाठी हे हॉटेल केव्हा सुरू केलं जाणार याची चर्चाही होऊ लागली. पण तसं काही होऊ शकलं नाही.
उत्तर कोरियानंही याबाबत अद्याप काहीच माहिती दिली नाही. जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून याची ओळख निर्माण झाली होती. पण इमारतीचं काम बराच काळ बंद असल्यानं इमारत कमकुवत झाल्याचे आरोप करण्यात आले. तर सीएनएनने दिलेल्या रिपोर्टनुसार १०५ मजल्यांच्या या इमारतीमधील अनेक मजल्यांचं काम अद्याप पूर्णच झालेलं नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे. २०१२ साली बीजिंगच्या एका कर्मचाऱ्यानं या हॉटेलच्या आतील भागाचे फोटो प्रसिद्ध केल्यानंतर काम अद्याप पूर्ण न झाल्याचा खुलासा झाला होता.
इमारत 'शापित' असल्याचा लोकांचा समज२०१८ साली रयुगयोंग हॉटेलमध्ये एक लाइट शो झाला होता. यात उत्तर कोरियाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी हॉटेल सर्वांसाठी खुलं होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. पण अजूनही हे हॉटेल बंदच आहे. बऱ्याच काळापासून हॉटेल बंद राहिल्यानं इमारत शापित असल्याचा समज येथील नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या इस्वायर या मासिकानं या इमारतीला आजवरच्या इतिहासातील सर्वात खराब इमारत म्हणून घोषित केलं आहे. एकेकाळी जगातील सर्वात उंच हॉटेल म्हणून ओळख प्राप्त झालेल्या या हॉटेलकडे आता कुणी ढुंकूनही पाहत नाही. २०१८ साली गिनिज बुकने दुबईतील Gevora हॉटेलला जगातील सर्वात मोठं हॉटेल म्हणून स्थान दिलं. या हॉटेलची उंची ११६८ फूट इतकी आहे.