रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी भारत आणि चीन हे दोन देश महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे व्लादिमीर पुतीन यांनी नुकतेच म्हटले होते. यानंतर लगेचच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मॉस्को दौऱ्यावर गेले. खरे तर या युद्धात भारताच्या भूमिकेडके संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच आता, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी बर्लिनमध्ये रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारताने रशियासमोर चतुःसूत्री अथवा फोर पॉइंट फॉर्म्युला ठेवला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युद्धासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना एस जयशंकर म्हणाले, "भारत चार तत्त्वांवर विश्वास ठेवतो. एक म्हणजे, हा शांततेचा काळ असायला हवा, दुसरे म्हणजे, रणांगणावर कुठल्याही प्रकारची समस्या सुटू शकत नाही, तिसरे म्हणजे, कुठल्याही प्रकारच्या यशस्वी शांतता प्रक्रियेसाठी रशियाने चर्चेच्या टेबलावर असायला हवे आणि चौथे म्हणजे, भारत ह संघर्ष सोडवण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असून चिंतित आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को आणि कीव दौऱ्यांसंदर्भात बोलताना जयशंकर यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सध्याच्या रशिया दौऱ्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले, “युद्धाच्या माध्यमाने वाद सोडविले जाऊ शकतात, यावर आमचा विश्वास नाही. आम्हाला वाटते की, जेव्हा चर्चा होईल, तेव्हा त्यात रशियानेही भाग घ्यायला हवा. राहिला प्रश्न भारताचा, तर हे रशिया आणि युक्रेनच्या इच्छेवर अवलंबून आहे, आम्ही त्यांच्यासोबत सातत्याने बोलत आहोत.”