बीजिंग-
भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी मॉक्सोत आयोजित परिषदेत रशियाकडून तेल खरेदीचं समर्थन करताना देशासाठी ते कसं फायदेशीर ठरलं हे समजावून सांगितलं. तसंच यापुढेही रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहिल असंही ठामपणे मत मांडलं. मॉक्सोत रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्या भेटीत जयशंकर यांनी केलेलं हे विधान पाश्चात्य देशांना दिलेलं एक खणखणीत प्रत्युत्तर मानलं जात आहे. रशियाकडून तेल खरेदी न करण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून भारतावर वारंवार दबाव वाढत आहे. याआधीही जयशंतर यांनी जागतिक व्यासपीठावरुन भारत-रशिया संबंधांवर केल्या केलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली आहेत. पण अमेरिकेसोबत तणावपूर्ण संबंध राहिलेल्या चीनला मात्र भारताच्या विधानानं आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत.
जयशंकर यांनी केलेल्या विधानाचं कौतुक करत चीनचे सरकारी माध्यम असलेल्या ग्लोबल टाइम्सचे पत्रकार हू शिजिन यांनी एक ट्विट केलं आहे. "भारत हा एक स्वतंत्र मुत्सद्देगिरी असलेला देश आहे, ज्याने जगभरात आपला प्रभाव वाढवण्यासाठी दारे उघडली आहेत. भारताचा व्यापक आंतरराष्ट्रीय प्रभाव अमेरिका वगळता इतर अनेक पाश्चात्य देशांना मागे टाकेल अशी अपेक्षा केली जाऊ शकते", असं ट्विट हू शिजिन यांनी केलं आहे. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झाले. यानंतर रशियावर एक एक करून अनेक निर्बंध लादले जाऊ लागले. मात्र भारताने तटस्थ धोरण अवलंबून रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली.
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशियात युनायटेड नेशन्सपासून ते एससीओपर्यंत भारताने उघडपणे युद्ध आणि हिंसाचाराचा निषेध केला आहे. रशियासोबतच्या व्यापारी संबंधांमुळे पाश्चात्य देश भारतावर नाराज आहेत. दरम्यान, जयशंकर दोन दिवसांच्या दौऱ्यावर मंगळवारी मॉस्कोला पोहोचले. भारत-रशिया संबंधांवर बोलताना परराष्ट्र मंत्री म्हणाले की, दोन्ही देशांमध्ये अतिशय मजबूत आणि वेळोवेळी अडचणीच्या काळात ठामपणे उभे राहणारे असे संबंध आहेत. कोरोना व्हायरस, आर्थिक दबाव आणि व्यावसायिक अडचणींचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. आता यावर आपण युक्रेन युद्धाचा परिणाम देखील पाहत आहोत.
संवादातून जागतिक आणि प्रादेशिक समस्या सोडवू"दहशतवाद आणि हवामान बदल या बारमाही समस्या आहेत. दोन्हीचा विकासावर वाईट परिणाम होतो. आमची चर्चा एकूण जागतिक परिस्थिती तसेच काही प्रादेशिक समस्यांवर लक्ष केंद्रित करेल", असं जयशंकर म्हणाले. सप्टेंबरमध्ये, चीनच्या सरकारी ग्लोबल टाईम्सने जयशंकर यांच्या विधानाचा हवाला देत म्हटलं होतं की अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत आम्ही भारताच्या स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचा आदर करतो आणि धोरणात्मक संयम पाहून आनंद होतो.