S Jaishankar Saudi Visit :भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर गल्फ कोऑपरेशन कौन्सिलच्या (GCC) च्या बैठकीसाठी सौदी अरेबियाची राजधानी रियाधला पोहोचले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या दौऱ्यात परराष्ट्र मंत्री गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) सदस्यांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. दरम्यान, GCC ही एक प्रादेशिक संघटना आहे, ज्यामध्ये अरब प्रदेशातील 6 देश आहेत. ही संस्था भारताचा विशेष व्यापारी भागीदार म्हणून उदयास आली आहे. भारताचे जीसीसी देशांशी राजकीय, व्यापार, ऊर्जा सहकार्य यासारख्या क्षेत्रात चांगले संबंध आहेत.
GCC म्हणजे काय आणि ते भारतासाठी का महत्त्वाचे आहे?GCC ही एक प्रादेशिक संघटना आहे, ज्यामध्ये अरब प्रदेशातील 6 देश आहेत. यामध्ये सौदी अरेबिया, कुवेत, संयुक्त अरब अमिराती (UAE), बहरीन, कतार आणि ओमान यांचा समावेश आहे. याची स्थापना 1981 मध्ये झाली आणि त्याचे मुख्यालय सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथे आहे. भारताच्या दृष्टिकोनातून ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण या बैठकीत परराष्ट्र मंत्री जीसीसी देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेणार आहेत.
गल्फ को-ऑपरेशन कौन्सिल (GCC) च्या चार्टरमध्ये या संस्थेचे वर्णन राजकीय, आर्थिक आणि सामाजिक प्रादेशिक संघटना म्हणून करण्यात आले आहे. या संघटनेचे कार्य सर्व क्षेत्रात GCC सदस्य देशांमधील एकीकरण, समन्वय आणि परस्पर सहकार्याला चालना देणे आहे. GCC व्यापार, सुरक्षा, पर्यटन, शासन, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रांमध्ये सदस्य देशांमधील समान नियम बनवणे आणि परस्पर सहकार्याला प्रोत्साहन देते.
GCC भारताचा प्रमुख भागीदार म्हणून उदयास आला असून, सुमारे 70 लाख भारतीय या देशांमध्ये काम करतात. आखाती देशांच्या विकासात भारतीय लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे, जगातील एकूण कच्च्या तेलापैकी सुमारे 34 टक्के तेल या 6 देशांमधून येते. यासोबतच सौदी अरेबिया आणि UAE सारख्या देशांनी भारतात अनेक प्रकारची गुंतवणूक केली आहे.