लंडन : सहारा उद्योग समूहाने ब्रिटन आणि अमेरिकेतील आपल्या तीन प्रसिद्ध हॉटेलांच्या विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या एका समूहाने दिलेला १.३ अब्ज डॉलरचा प्रस्ताव धुडकावला आहे. या हॉटेलांची जास्त किंमत लावणाऱ्या इच्छुक खरेदारांना रोखण्याची खेळी म्हणून इतक्या कमी किमतीचा प्रस्ताव दिला गेला असल्याचा आरोप सहारा समूहाने केला आहे. गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी सहारा समूहाकडून विदेशातील हॉटेले विक्रीला काढण्यात आली आहेत. गुंतवणूकदारांचे पैसे दिले नाही म्हणून सहाराचे प्रमुख सुब्रत राय तुरुंगात होते. हे पैसे देण्यासाठी मालमत्ता विकण्याचा प्रस्ताव सहाराने दिला होता. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामिनावर सोडले आहे. ब्रिटिश कंपनी जसदेव सग्गरच्या नेतृत्वाखालील ३ असोसिएटकडून ही हॉटेले खरेदी करण्याचा प्रस्ताव आला आहे. या असोसिएटमध्ये काही खाजगी संपत्ती व्यवस्थापन कंपन्यांचा समावेश आहे. सहाराच्या हॉटेलांसाठी १.३ अब्ज डॉलरचा प्रस्ताव त्यांनी दिला होता. तथापि, सहारा समूहाने त्यावर कडक प्रतिक्रिया दिली आहे. सहाराच्या प्रवक्त्याने सांगितले की, आलेला प्रस्ताव आधारहीन आहे. आमच्या मालमत्तांच्या बाजार मूल्यापेक्षा तो कितीतरी कमी आहे. या मालमत्तांची किंमत घसरविण्याची चलाखी यामागे आहे. या मालमत्ता खरेदी करू इच्छिणाऱ्या अन्य बोलीकर्त्यांना निराश आणि परावृत्त करण्यासाठी मुद्दाम कमी किमतीची बोली लावण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)
सहाराने हॉटेल विक्रीचा प्रस्ताव नाकारला
By admin | Published: July 28, 2016 1:33 AM